‘महिला न्याय गॅरंटी’ काँग्रेसचे ऐतिहासिक पाऊल.
धुळे, दि. १३ मार्च :
नरेंद्र मोदी देशातील अरबपतींना १६ लाख कोटी रुपये माफ करतात पण काँग्रेस पक्ष मात्र महिलांना मदत करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. महालक्ष्मी योजनेचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार आहे. महिला न्याय गॅरंटी हे देशाच्या इतिहासात क्रांतीकारी पाऊल ठरणार आहे, असे काँग्रेसचे खासदार राहुल यांनी सांगितले.
महिला सक्षमिकरणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुमधडाक्यात महिला आरक्षण जाहीर केले, जल्लोषही केला परंतु हे आरक्षण सर्वे केल्यानंतर लागू होईल म्हणजे १० वर्षानंतर परंतु काँग्रेस पक्षाचे सरकार आले तर महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल. विधानसभा, लोकसभेसह सर्व ठिकाणी महिलांची भागिदारी वाढली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना, तसेच आर्थिक सर्वे करुन प्रत्येक विभागात महिला, दलित, अल्पसंख्याक, मागास समाजाची किती भागिदारी आहे हे तपासणार आहे. काँग्रेसने हरित क्रांती, धवल क्रांती, संगणक क्रांती करुन इतिहास घडवला आणि आता जातनिहाय जनगणना करून जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी हे सुत्र आमलात आणणार आहे.
युपीए सरकार असताना ४०० रुपयांचा गॅस सिलिंडर नरेंद्र मोदींना महाग वाटत होता पण त्यांच्या सरकारने तो ९०० रुपये केला तरीही त्यांना तो महाग वाटत नाही. हिंदुस्थानचे सरकार ९० लोक चालवतात त्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागास समाजाचे लोक अत्यल्प आहेत. सर्व क्षेत्रात या समाज घटकांचे प्रतिनिधित्व कमी आहे आणि हेच चित्र काँग्रेस पक्षाला बदलवायचे असून ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा भागिदारी हे सुत्र लागू करायचे आहे असे राहुल गांधी म्हणाले.
महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यावेळी बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने महिलांसाठी नेहमीच काम केले आहे. मॅटरनिटी लिव्ह, हुंडाविरोधी कायदा, कन्या भृण हत्या विरोधी कायदा, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिला अत्याचाराविरोधातील कायदा असे अनेक कायदे करुन महिला सक्षमिकरणाची पावले उचलली आहेत. महिला सक्षमीकरण करुन त्यांना त्यांचे हक्क देण्याचे काम काँग्रेस करत आहे. आज जाहीर केलेल्या महिला न्याय गॅरंटीचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार असून अलका लांबा यांना महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्याबद्दल काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
