राज्यपालांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान!
मुंबई, दि. 10 सप्टेंबर 2020:
कोरोना योध्दे म्हणून समाजाच्या विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या डाँक्टर, पोलिस, स्वयंसेवी संस्था, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सफाई कामगार, वैद्यकीय सेवा देणारी सेवक अशांचा सन्मान आज स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी हा उपक्रम राबवला.
कोरोना महामारीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजातील अनेकजण काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे निवडक 40 जणांचा प्रातिनिधीक सत्कार राजभवनावर राज्यपालांच्या हस्ते केला.
कोरोना योध्दे म्हणून समाजातील अशी असंख्य माणसे जे काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळे आम्ही यातील काही प्रातिनिधिक सन्मान आज करीत आहोत,असे आशिष शेलार म्हणाले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, भारत हा असा देश आहे की सेवाभाव हा या देशाचा आत्मा आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या कोणत्याही संकटात हा देश डळमळला नाही. कोरोनाचे संकट हे असेच आहे समाजातील अनेक माणसे स्वयंम प्रेरणेने योध्दे म्हणून उतरले आहेत. संकटाना घाबरण्याचे कारण नाही, फक्त सावधानता बाळगण्याची गरज आहे., असे आवाहन त्यांनी केले व कोरोना योध्यांचे कौतुक केले. तसेच सेवा काम करणाऱ्यांना शोधून त्यांचा असा सन्मान करणे या उपक्रमाचे ही त्यांनी कौतुक केले.
यावेळी, डाँ. जलिल पारकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे आणि पोस्टमन महमद रफीक काझी, वाँर्ड आँफिसर विनायक विस्पुते, योगा प्रशिक्षक सुनयना रेकी, डा. सशांक जोशी, आयुर्वेदिक गोळ्या मोफत वाटणारे अमेय हेटे, आरोग्य सेवक विकास देशमुख, मनोरंजन करमारे स्मृती गंध, लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबविणारे गंधारचे कलावंत अव्दैय टिल्लू, सई डिंगणकर तसेच अन्नधान्यांची मदत पोहचवणारे किशोर पुनवत, सफाई कामगार रमेश साळुंखे, आणि कोरोना पार्थिवावर अंत्यसंस्कार करणारे विरल त्रिवेदी यांच्यासह एकुण 40 जणांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
