मुंबई कोस्टल रोड पूर्णपणे टोलमुक्त ठेवा..
मुंबई, दि. ११ मार्च:
मुंबईच्या विकासात मोलाचा ठरणारा कोस्टल रोड हा काँग्रेसच्या संकल्पनेतुन आणि पुढाकारातून उदयास आलेला आहे. महायुती सरकार या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असले तरी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात ही योजना आखली व पृथ्वीराज चव्हाण यांनी अंमलबजावणीसाठी मोठे पाऊल उचलले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही या प्रकल्पाला गती देण्याचे काम झाले आहे. आज या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे याचा आनंद आहे परंतु कोस्टल रोड हा पूर्णपणे टोलमुक्त असला पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
कोस्टल रोड संदर्भात प्रतिक्रीया देताना वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मुंबई कोस्टल रोड प्रकल्प मोठ्या विलंबानंतर आणि लोकार्पणाच्या तारखांवर तारखा पुढे ढकलल्यानंतर शेवटी सर्वसामान्यांच्या सेवेत अंशत: खुला झाला आहे. कोस्टल रिंगरोड पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर मुंबईतील उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून अतिशय फायदेशीर ठरेल. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल आणि मुंबईच्या आर्थिक विकासास आणखीन चालना मिळेल. कोणत्याही सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला पाहिजे. कोस्टल रोडसाठी एक समर्पित बस लेन असणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण परवानग्या मागताना तसा शब्द पर्यावरण मंत्रालयाला दिला आहे.
कोस्टल रोड आर्थिकरित्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी पर्याय शोधण्यासंदर्भात महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मांडताना प्रशासकाने आपल्या भाषणात उल्लेख केला होता. हा मार्ग कायमचा टोलमुक्त राहिला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाने तेव्हाही घेतली होती आणि आजही आहे. त्यामुळे हा रस्ता शेवटपर्यंत टोलमुक्त राहिला पाहिजे या आश्वासनपूर्तीसाठी आम्ही सरकारला धारेवर धरल्याशिवाय गप्प बसणार नाही.
