मोठे परिवर्तन घडविणारा कोस्टल रोड प्रकल्प…
मुंबई, दि. ११ मार्च :
किनारी रस्ता हा मुंबईकरांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविणारा प्रकल्प ठरणार असून मुंबईचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे ध्येय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
किनारी रस्त्याला परवानगी मिळताना अनेक अडचणी आल्या, तथापि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि सीआरझेडची मर्यादा बदलू न देता आणि मोकळ्या जागेत हरीत क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेऊन त्यावर मात करण्यात आल्याचे ते म्हणाले.
किनारी रस्ता पुढे वांद्रे-वर्सोवा, वर्सोवा-विरार, विरार-पालघर असा टप्प्याटप्प्याने विस्तारणार असून मुंबई महानगर क्षेत्रात कोठेही एका तासात पोहोचता यावे यासाठी रस्त्यांची एक रिंग तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकरांना लाभदायी ठरणाऱ्या किनारी रस्त्याचा एक टप्पा पूर्ण होतो याचे समाधान असल्याचे सांगून त्यांनी यासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे आभार मानले.
मुंबईतील प्रवासादरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो, अटल सेतू, जमिनीखालून रस्ते असे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांदरम्यान अडचणी येतात तथापि सकारात्मक भूमिका ठेवली की त्यातून मार्ग निघतात, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. मुंबईची प्रदूषित शहर ही ओळख बदलून वेगवान प्रवासासाठी शासन पावले उचलत आहे. वाहतूक कोंडी कमी करून मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हरीत पट्टे तयार करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने सध्या सुरू असलेले विविध प्रकल्प मुंबईच्या वैभवात भर घालणारे आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नमूद करून भविष्यातील सुखकर प्रवासासाठी मुंबईकरांनी आता होत असलेल्या त्रासात सहनशीलता दाखविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकाद्वारे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. मुंबईला वेगवान करणारा हा प्रकल्प आहे. सुमारे 14 हजार कोटी रुपये खर्चाच्या 10.58 कि.मी. लांबीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका असतील. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. उर्वरित काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने वरळी ते मरीन ड्राईव्ह या मार्गिकेवर सध्या सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला ‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ असे नाव देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या बसेसना हिरवा झेंडा दाखवून किनारी रस्त्याच्या मार्गिकेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
