कोस्टल रोडचा वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्ग अंशतः खुला..
मुंबई, दि. ११ मार्च –
सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे शासनाचे उद्दिष्ट साध्य करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. इंजिनिअरींगचा चमत्कार असणारा किनारी रस्ता हा या अनुषंगाने उपयुक्त प्रकल्प असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
प्रियदर्शिनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या 300 एकर जागेत आबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून मुंबईकरांसाठी हे ऑक्सीजन पार्क ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) ची वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मार्गिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंशतः खुली करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, स्थानिक लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, डॉ.अश्विनी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य शासन सर्वसामान्यांना लाभ होणारे प्रकल्प वेगाने पूर्ण करीत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या किनारी रस्त्यामधील एका मार्गिकेचा आज शुभारंभ होत असून पुढील टप्पा मे महिन्यापर्यंत सुरू होईल. वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्यामध्ये सहाय्यभूत ठरणाऱ्या या प्रकल्पात सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. उपलब्ध मोकळ्या जागेत हरीत क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. मुंबईचे भूमिपूत्र असलेल्या कोळी बांधवांच्या मागणीनुसार या रस्त्यांच्या खांबांमधील अंतर 120 मीटरपर्यंत वाढवून त्यांना न्याय दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा रस्ता पुढे टप्प्याटप्प्याने दहिसर आणि पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
गेमचेंजर ठरणारा अटल सेतू, किनारी मार्ग यांसह इतर प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईत कोठेही एका तासात पोहोचता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिद्धीविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येईल, यासाठी महापालिकेमार्फत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगून मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या गृह प्रकल्पांमुळे बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाजवळ उचित ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
