संघर्षाच्या वेळी काँग्रेस सोडलेल्यांना माफी नाही..

0
IMG-20240309-WA0119

मुंबई, दि. ९ मार्च :

काँग्रेस पक्ष गांधी-नेहरुंच्या आदर्शावर चालतो, काँग्रेसने सर्वजातीधर्मांना सोबत घेऊन काम केले आहे. सोनियाजी गांधींनी पंतप्रधानपदाचा त्याग केला व देशासाठी काम केले परंतु आज काही लोक ईडी सीबीआयच्या भितीने पक्ष सोडून गेले. काँग्रेस पक्षाने या लोकांना सर्वकाही दिले परंतु संघर्ष करण्याची वेळ आली तेव्हा पक्ष सोडून गेले, त्यांना याचा पश्चाताप होईल पण अशा लोकांना कांग्रेस कधीही माफ करणार नाही आणि पुन्हा काँग्रेसमध्येही त्यांना जागा नाही, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ठणकावून सांगितले.

मुंबई विभागीय काँग्रेसचे एक दिवसाचे ‘रणशिंग’ प्रशिक्षण शिबिर मुलुंड येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. चेन्नीथला म्हणाले की, मोदी सरकारने १० वर्षात कोणतेही विकासाचे काम केले नाही परंतु ‘मोदी गॅरंटी’ अशा जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. २ कोटी नोकऱ्या, परदेशातील काळापैसा आणून १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पेट्रोल, डिझेल ३५ रुपये लिटरने देणार, या गॅरंटी मोदींनी २०१४ साली दिल्या होत्या त्याचे काय झाले. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मोदी गॅरंटी अशा जाहिराती देत आहेत. तिसऱ्यांदा निवडून येणार नाही याची नरेंद्र मोदींना खात्री आहे म्हणूनच ते सर्व पक्षातील आयाराम गयाराम यांना जवळ करत आहेत. आता निवडणुकांचे दिवस आहेत. लोकसभा, विधानसभा व नंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. यावेळी संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. सर्वजणांनी एकजूट होऊन काम केले तर मविआच्या सर्वात जास्त जागा जिंकून येतील असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

 

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी शिबिराचे प्रास्ताविक भाषण केले. मीडिया व प्रसिद्धी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन खेरा, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, जेष्ठ पत्रकार निरंजन टकले, काँग्रेस सरचिटणीस अमर खानापूरकर, नेहा राठोरे, नॅशनल वॉर रुमचे अध्यक्ष शशिकांत सेंथिल यांची व्याख्याने झाली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवक्ते व मुंबई काँग्रेसच्या स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *