मेट्रो, BKC, वांद्रे-वरळी सेतू सह अनेक विकास कामे काँग्रेसनेच केली.
मुंबई, दि. ९ मार्च :
मुंबई शहराचा विकास व आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख ही काँग्रेस काळातच झाली. काँग्रेस सरकार असतानाच मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यटन सारख्या क्षेत्रांची भरभराट झाली. मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस सरकारने आणलेल्या आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स, मंत्रालय, सरकारी कार्यालयांचा विस्तार हा काँग्रेसच्या काळातच झाला. राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतू, चेंबूर FCLR लिंक रोड, कोस्टल रोड, अटल सेतू या प्रकल्पांची आखणी विलासराव देशमुख आणि डॉ. मनमोहनसिंह यांचे सरकार असताना करण्यात आली, असे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले आहे.
मुंबई विभागीय काँग्रेसचे एक दिवसाचे ‘रणशिंग’ प्रशिक्षण शिबिर मुलुंड येथे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन मल्लिकार्जून खरगे यांनी ऑनलाईन केले, यावेळी ते बोलत होते, खरगे पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना दोन वर्षांपासून तिजोरी लुटण्याचे काम सुरु आहे, महापालिका फक्त भाजपा आमदारांनाच निधी देते. धारावी व मुंबईतील महत्वाचे भूखंड सर्व नियम व अटी बाजूला ठेवून अदानी व भाजपाच्या मित्रांना दिले जात आहेत. मुंबई मेट्रोसाठी पर्यावरणाचा विचार न करता झाडांची कत्तल करण्यात आली. सरकारी धोरणे सामान्य मुंबईकरांच्या हितासाठी नाही तर केवळ मुठभर श्रीमंतांसाठी आखली जात आहेत. महिला बचत गट व बेरोजगारांना दिलेले स्वच्छतेचे काम काढून मोठ्या कंपनीसाठी टेंडर काढले असून यामुळे ७५ हजार लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात असून मुंबईतून कोट्यवधींची गुंतवणूक दुसऱ्या राज्यात पळवली जात आहे. महानंद दुध प्रकल्पही गुजरातच्या हाती सोपवला आहे, याला भाजपाने विरोध केला नाही व त्यासंदर्भात एक शब्दही काढला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावर मोठ-मोठ्या बाता मारतात आणि विरोधी पक्षांवर आरोप करतात परंतु कॅगच्या अहवालावर ते बोलत नाहीत. कॅग व काही प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार भाजपाने ८.५ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. देश आणि समाजाच्या हिताचे भाजपाला काही देणेघेणे नाही. पक्ष फोडणे, नेत्यांना विकत घेणे हे काम ते करत असतात व आतापर्यंत भाजपाने विविध पक्षातील ४२० आमदारांना विकत घेतले आहे. महाराष्ट्रातही हेच चालले आहे, महायुती सरकारही आमदारांची तोडफोड करुन बनले आहे. महाराष्ट्रातील वातावरण मविआच्या बाजूने आहे. मुंबई व महाराष्ट्राला भेदभावाची वागणूक दिली जाते हे जनतेपर्यंत जाऊन सांगितले पाहिजे. घरोघरी जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवा आणि विरोधकांचा एकही खासदार जिंकून येणार नाही यासाठी काम करा, असे आवाहन मल्लिकार्जून खरगे यांनी केले आहे.
