शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ हीच मोदींची गॅरंटी!
पुणे दि. ७ मार्च:
देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत त्याच मोदी गॅरंटी देत आहेत पण ही कोणाच्या पैशाने जाहीरात दिली जात आहे. आज ते सांगत आहेत की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींची गॅरंटी आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीला संकटात नेणारा कारभार मोदींकडून सुरू असून सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवे. जवाहरलाल नेहरुंबद्दल काहीही बोललं जात आहे. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचे योगदान हा देश स्वतंत्र करण्यासाठी होते अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते.
भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडत आहे. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल. मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष आहे. राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो हिंमत असेल, तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे पण मोदींनी चौकशी केली नाही मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळं भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.
नरेंद्र मोदींचे कालचे भाषण पहा, ते बंगालमध्ये होते. तिथं ममता बॅनर्जीवर बोलले. ममता आणि मी एकत्र काम केलं. त्यांच्या घरी मी गेलो आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या ममता यांचं घर अगदी छोटं, अशा वाघिणीवर जनता कायम विश्वास ठेवत आली आहे, पण त्या वाघिणीवर मोदी बोलत आहेत, हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही असेही पवार म्हणाले..
