मुंबई काँग्रेसच्या मोर्चावर सरकारच्या आदेशाने अत्याचार..

0
IMG-20240306-WA0133

मुंबई, दि. ६ मार्च:

मुंबईतील स्वच्छता स्वयंसेवकांचा प्रश्न घेऊन मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निघालेला इंडिया आघाडीचा मोर्चा सरकारच्या आदेशाने दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना थेट आव्हान देणारे भाजपाचे आमदार नितेश राणेवर सरकार कारवाई करत नाही. पोलिसांना थेट आव्हान दिले तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या भाजपाच्या गुंडांवर सरकार कारवाई करत नाही मात्र १५ हजार मराठी भूमीपुत्र तसेच महिलांच्या हक्कासाठी मोर्चा काढला तर पोलिसांच्या मदतीने तो दडपला जातो हे मुंबईकरांचे दुर्भाग्य आहे. भाजपा-शिंदे-पवार सरकारच्या या दडपशाहीचा धिक्कार करत सरकारने आवाज दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारच, असा निर्धार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.

भाजपा-शिंदे-पवार सरकारचा खरपूस समाचार घेत प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील १५ हजार स्वच्छता स्वयंसेवकांना बेरोजगार करुन मित्रांसाठी १२०० कोटी रुपयांचे ग्लोबल टेंडर काढणाऱ्या महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा काढण्यात येत होता परंतु पोलिसांनी मोर्चकऱ्यांची धरपकड केली. महिलांशी धक्काबुक्की केली. सरकारचा पोलिसांवर दबाव आहे या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. लोकशाहीमध्ये आवाज उठवण्याचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आम्हाला दिलेला आहे त्या हक्कापासून कोणीतीही शक्ती रोखू शकत नाही. केंद्रातील हुकूमशाही भाजपा सरकारप्रमाणे राज्यातील भाजपा-शिंदे पवार सरकारही मनमानी पद्धतीने काम करत असून विरोधकांचा आवाज दडपला जात आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढला तर त्यावर कारवाई होते हे मुंबईकरांचे दुर्भाग्य आहे. सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या मोर्चा पोलीस बळाचा वापर करत थांबला जातो परंतु गुंडगिरी करणाऱ्या सत्ताधारी पक्षांच्या आमदारांवर हे सरकार कारवाई करत नाही.

मुंबईतील १५ स्वच्छता स्वयंसेवकांना बेरोजगार करुन त्यांच्यावर विसंबून असलेल्या ७५ हजार लोकांना रस्त्यावर आणण्याचे हे षडयंत्र आहे. या स्वयंसेवकांना महिन्याला फक्त ६००० रुपये देता आणि मित्रांसाठी १२०० कोटी रुपयांचे टेंडर काढता? असा संतप्त सवाल करत मित्रांसाठी काढलेले हे १२०० कोटी रुपयांचे ग्लोबल टेंडर रद्द करा व तेच पैसे या स्वयंसेवकांना द्या. मराठी माणसाचा, महिलांचा, भूमिपुत्रांचा आवाज ऐका व त्यांना न्याय द्या, असे आवाहनही वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.

 

मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्यासह सर्व मोर्चाकऱ्यांना ताब्यात घेऊन यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *