सदनिका घोटाळ्यात CM चा वरदहस्त आहे का?

0
images - 2023-08-22T124154.218

मुंबई, दि. ६ मार्च :

मुंबईतील साकीनाका येथे क्रांतीनगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले असून यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप होत असताना हा घोटाळा होतो. यामध्ये मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे का? असा सवाल करत या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुंबईतील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नसीम खान उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले की, साकीनाका येथे क्रांती नगर, बैल बाजार येथील झोपडपट्टी धारकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले. या चावी वाटपात मोठा घोटाळा झाला आहे. हे चावी वाटप करताना बोगस नावे घुसविण्यात आली आहेत. त्यानंतर लगेच या सदनिकांची खरेदी केली गेली. यातील काही लोक युपी मधील आहेत. ही शासनाची फसवणूक आहे.

या प्रकरणात १० कोटीच्या ५३ सदनिका संदर्भात बनावट कागदपत्रे बनवली गेली आहेत. हे हिमनगाचे टोक असून शेकडो कोटींचा यामध्ये घोटाळा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआटीमार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्याला कोणाचा आशिर्वाद आहे हे समोर आले पाहिजे. अधिकारी आणि लोकप्रतिनीधींनी संगनमताने केलेला हा घोटाळा असल्याची खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *