आता कल्याण ते तळोजा व कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो..
ठाणे, दि. ४ मार्च:
मुंबई व एमएमआरडीए परिसरात मेट्रोचे जाळे बनवले जात आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो होत असून कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आणली जाणार आहे. तिसरी मुंबई ही नवी मुंबई ते कल्याण होत आहे. एम.एम.आर.डी.ए नवीन डीपीआर तयार करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणत मेट्रोचे जाळे पसरविले जाणार आहे. राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम करत आहे.
शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन आपल्या दारी” च्या माध्यमातून योजनांचे थेट लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम राज्यभर घेतला.15 एप्रिल 2023 पासून “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हयात एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदान, कल्याण शिळफाटा, कोळे, कल्याण येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, हे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. एकदा आवाहन केल्यानंतर जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी जोमाने कामाला लागले. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले.वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली. यातून समृध्दी महामार्ग, अटल सेतू मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आणला.
स्वच्छतेमध्ये महाराष्ट्राला क्रमांक एक चा पुरस्कार मिळाला. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगले काम होत आहे. यामुळे प्रदूषण झपाट्याने कमी होत आहे. हे सरकार दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे, यातूनच मराठा आरक्षणाचाही प्रश्न निकाली काढला. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्र सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेर होतोय वेगवान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला, आपल्या देशाला जगात सन्मान मिळवून देणारे, मान वाढविणारे प्रधानमंत्री लाभले आहेत. आपण भाग्यवान आहोत. नरेंद्र मोदींनी 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे.
बेरोजगारांनाही बळ देण्यासाठी हे शासन आता ठाणे जिल्ह्यातही 6 व 7 मार्च रोजी “नमो महा रोजगार” मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे. एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे जाळे पसरत आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातही हे शासन जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम करीत आहे. जनता “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देत आहे, जनतेला विश्वास वाटतो की, हे शासन खरोखर जनतेचे शासन आहे. हे शासन आपले दुःख ऐकून त्यावर उपाययोजना करणारे शासन आहे.
