अमित शाह ५ तारखेला महाराष्ट्रात !
नागपूर, दि. ३ मार्च
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ तारखेला अकोला, जळगाव व संभाजी नगर येथील कार्यक्रमात उपस्थित राहणार असून अकोला येथे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला व अमरावती या लोकसभा क्षेत्रातील निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी जळगाव येथे युवा महासंमेलनात मार्गदर्शन करतील. तर सायंकाळी संभाजीनगर येथे अहमदनगर, शिर्डी, जालना व संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ४ तारखेला नागपूर येथे राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनासाठी राज्यभरातील १८ ते ३५ वयोगटातील १ लाख युवक सहभागी होतील.
६ तारखेला राज्यातील सर्व २८८ विधान सभांमध्ये ५ हजार महिलांच्या उपस्थितीत नारीशक्ती वंदन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला ऑनलाईनच्या माध्यमातून संबोधित करतील. ७ ते १५ मार्च पर्यंत राज्यभर भाजपा कार्यकर्ते मागील १० वर्षांत मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नमस्कार पोहचविणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक जाहिरनाम्यासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठविणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यभरातील ३३ हजार ३२३ भाजपा कार्यकर्ते सूचना पत्राची पेटी घेऊन घरोघरी पोहचणार असून सर्व सूचना भाजपा केंद्रीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत असे बावनकुळे म्हणाले.
पत्रकार परिषदेतला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, जिल्हा महामंत्री अनिल निधान उपस्थित होते.
