‘मविआ’त मोदी द्वेषाने एकत्र आलेली मंडळी!
जळगाव, दि. २९ फेब्रुवारी: –
महाविकास आघाडीत फिस्कटले आणि एकत्र यायचे दाखवले तरी ते एकत्रित येऊ शकत नाही. केवळ मोदी आणि भाजपा द्वेषाने एकत्र आलेली ही मंडळी आहेत. त्यांची विचारधारा एक नाही. त्यांनी मोट बांधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मानणारा मतदार हा एकत्रित होऊ शकत नाही, असा हल्लाबोल भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरांनी विरोधकांवर चढवला.
भाजपा नेते प्रविण दरेकर हे आज पक्षाचे निरीक्षक म्हणून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी दरेकर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी भाजपा आमदार डॉ. राहुल आहेरयांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दरेकर म्हणाले की, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय मत आहे ते जाणून घेऊन पक्ष नेतृत्वाकडे देणे अशा प्रकारचा या दौऱ्याचा उद्देश आहे. तसेच भाजपाची ताकद प्रचंड आहे. संघटनात्मक नेटवर्क आहे. त्यामुळे पक्ष, चिन्ह कमळ या जिल्ह्यात पहिल्यापासून आहे आणि ते आजही जोमाने वाढले असल्याचे त्यांनी म्हटले.
दरेकर पुढे म्हणाले की, उमेदवारी निश्चित करण्याचे अनेक भाग असतात. एका दिवसात आम्ही निरीक्षक म्हणून आलो आणि लगेच उमेदवारी दिली असेही काही नसते. परंतु उमेदवारी देत असताना जे काही निकष असतात, टप्पे असतात त्यातला हा टप्पा म्हणावा लागेल. त्याचबरोबर भाजपा पूर्णपणे मजबूत आहे. आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा अत्यंत क्षमतावान नेता आहे. ज्यांनी १० वर्षात देशातील जनतेला विश्वास दिला. त्यामुळे देशवासियांचे मत मोदींच्या बाजूने पक्के ठरले आहे. प्रत्येक नागरिक हा पंतप्रधान मोदींना मत करणार आहे. त्यांचे मत खासदाराला जाईल आणि तो खासदार देशाचा पंतप्रधान ठरवणार आहे. देशवासियांची मानसिकता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व्हावेत अशी भावना आहे. सर्व देशात जी भावना आहे तीच महाराष्ट्रातही असून गेल्यावेळेपेक्षा प्रचंड यश भाजपाला या निवडणुकीत मिळेल असा आशावादही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.
