‘जो जमीन सरकार की है वो अदानी की’!
‘जो जमीन सरकार की है वो अदानी की’ !
मुंबई, दि. २८ फेब्रुवारी:
धारावीतील मोदानी पुनर्वसन प्रकल्पातून धारावीकरांच्या हक्कांना पायदळी तुडवले जात आहे, ७ लाख लोकांना बाहेर हाकलण्याचे षडयंत्र आहे.रेल्वेच्या जागेवर पुनर्वसन झाले तर मालकी हक्क मिळणार नाही. रेल्वेनेच त्यांची जागा देण्यास नकार दिला आहे. धारावीचे नाव धारावीकरांनी मोठे केले आहे, त्यांनाच बेघऱ केले जात आहे. हा मोठा जमीन घोटाळा असून अदानीला सर्व करातून माफी देण्यात आली आहे. धारावीच्या धर्तीवर एअर पोर्ट, एअर पोर्ट कॉलनी, मुलुंड, रमाबाई आंबेडकर नगर, अभ्युदयनगर, सिंधी कॉलनी, मोतीलाल नगर, कोरबाची जागा, सर्व जागा एकाच व्यक्तीला दिल्या जात आहेत. कोण आहे हा अदानी? असा संतप्त सवाल विचारत, ‘जो जमीन सरकार है वो अदानी की है’, हेच भाजपा सरकारचे धोरण आहे, असा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.
विधिमंडळात २९३ च्या चर्चेत भाग घेत वर्षाताई गायकवाड यांनी मुंबईतील मुलभूत प्रश्न मांडत सरकारवर तुफान हल्ला केला. सरकारचे वाभाडे काढताना वर्षाताई म्हणाल्या की, मुंबईतील सर्व जागा अदानीलाच दिल्या जात आहेत, काम सुरुही झाले नाही तरी सर्व फायदे अदानीला दिले जात आहेत,इतर विकासकांना डीसी रुल पण अदानीसाठी स्वतंत्र डीसी रुल कशासाठी? अदानीने देशासाठी काय केले आहे ? दीड वर्षापासून फक्त मित्रकाळ सुरु आहे. मुंबई विकायला काढली आहे, मुंबई ही मुंबईकरांचीच राहिली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यात मुंबईतील ४०० किमीचे रस्ते काँक्रीटचे होतील असे सांगितले होते, त्यासाठी ७ हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले. दीड वर्षात या रस्त्यांचे ५ टक्केही काम झालेले नाही ही वस्तुस्तिती आहे. आता पावसाळा सुरु होईल त्यावेळी या रस्त्यांची काय अवस्था असेल. विधिमंडळात आश्वासन दिले तेही पूर्ण केले जात नाही. या दीड वर्षात फक्त कंत्राटदार मित्रांसाठी टेंडरवर टेंडर काढली जात आहेत. मित्रांचे भले व मुंबईचा ऱ्हास होत आहे. मुंबईतील मोकळी मैदाने मुंबईचा श्वास आहेत. ५६२ हेक्टर क्षेत्रफळामध्ये ११०४ मोकळ्या जागा आहेत. यातील १ हजार जागांच्या महापालिकेच्या माध्यमातून विकास केला जातो. RG असतील वा PG असतील मुंबईतील मोकळ्या जागांच्या खाजगीकरणाचा डाव मांडला आहे. विरोध केल्यानंतर आरजी पीजी चे धोरणे मागे घेतले असले तरी मोक्याच्या व महत्वाच्या जागा मित्रांच्या घशात कशा घातल्या जातील याचा पुरेपुर प्रयत्न आजही सुरुच आहे. मुंबईतील उद्यानांचा आमदार निधीतून विकास करून त्या महापालिकडे हस्तांतरीत केल्या जातात पण महापालिका नंतर या उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करते आणि नंतर त्या जागा खाजगी क्लबला द्यायचा व जनतेला वंचित ठेवायचे. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा सुद्धा कसलीही जनसुनावणी न घेता खाजगी व्यक्तीला दिली. मुंबईतील मोकळ्या जागा खाजगी लोकांना देणे बंद झाले पाहिजे.
मुंबईमध्ये सध्या डीप क्लिनिंग चालू आहे. मुंबईत साफसफाई करण्याचे काम महापालिकाचे आहे. मुंबईची साफसफाई करण्याचे काम संस्थांच्या माध्यमातून ७५ हजार लोक करत आहेत, आता या संस्थांचे काम बंद करुन त्यांना बेरोजगार करण्याचे काम केले आहे. यासाठी १२०० कोटीचे टेंडर काढले आहे. मित्रासाठी ७५ हजार लोकांना बेरोजगार केले जात आहे. या कामासाठी एका व्यक्तीला प्रतिदिवस २०० रुपये मिळतात तर महिन्याला एकूण ६००० रुपये मिळतात परंतु मित्राला हे कंत्राय देताना हे दर वाढवले व प्रति महिना १९ हजार ३२३ रुपये करून एकूण २८ हजार २२३ रुपये केले आहे. चार वर्षांसाठी ३६० कोटी रुपये असलेले टेंडर आता प्रत्येक वर्षासाठी ३०० कोटी म्हणजे चार वर्षांसाठी १२०० कोटी रुपयांचे केले आहे, हे कोणासाठी चालले आहे.
धारावी क्रीडा संकुलातून गरिब मुले खेळाडू व्हावेत यासाठी क्रीडा संकुल बांधले त्यावरही मित्राची नजर गेली, ती जागाही मित्राला देण्याचा घाट घातला जात आहे आणि तेथे दारुचा अड्डा सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खेळाच्या सर्व सुविधा कमी किमतीत चालु होत्या पण खाजगी मित्राला दिल्यानंतर हे दर प्रचंड वाढवले आहेत, हे शुल्क गरिब मुलांना परवडणारे नाही. मुंबईत आज पाणी, रस्ते, ट्राफिक, पर्यावरण, मोकळ्या जागा हे प्रश्न महत्वाचे आहेत. मुंबईतील प्रदुषणात प्रचंड वाढ झालेली आहे, श्वसनाचे आजार वाढले आहेत. वयोवृद्ध, लहान मुलांमध्येही खोकल्याचे प्रमाण वाढले आहे, ही परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली आहे. अर्धवट प्रकल्प व प्रदुषणावर का बोलत नाहीत. भाजपा व शिंदे गटाच्या आमदारांना ३० ते ३५ कोटी रुपये निधी दिला, काहींनी तर एकाच दिवसात निधी मिळाला, काही माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेश देऊन त्यांना सात दिवसात निधी दिला परंतु विरोधी पक्षाच्या आमदाराला निधी दिला नाही असा आरोप वर्षाताई यांनी केला.
मुंबईतील प्रश्नावर वर्षाताई गाडकवाड बोलत असताना सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सातत्याने अडथळे आणण्याचे प्रयत्न केले पण त्या बधल्या नाहीत. एकहाती किल्ला लढवत वर्षाताई गायकवाड यांनी सरकारचे पुरते वस्त्रहरण केले.
