अर्थसंकल्पात केवळ घोषणा , दूरदृष्टीचा अभाव.
अर्थसंकल्पात केवळ घोषणा , दूरदृष्टीचा अभाव.
मुंबई, दि. २८ फेब्रुवारी;
अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडलेला बळीराजा, वाढत्या महागाईने त्रस्त दीनदलीत, गोरगरीब, अल्पसंख्यांक, आदिवासी, महिला वर्ग, बेरोजगारीने हताश युवा वर्गाला अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती परंतु महायुती सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पाने त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणांचा वर्षाव करण्यात आला असून दूरदृष्टीचा अभाव दिसून आला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प महसुली तुटीचा, गतिहीन, नीतिहीन, कृतिहीन फसवा आणि दिशाहीन अर्थसंकल्प आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
महायुती सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, आर्थिक शिस्तीचे पायंडे मोडून अंतरिम बजेटच्या नावाने जवळपास पूर्ण बजेट मांडताना सरकारने उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ न ठेवता ‘मित्र कंत्राटदाराचे खिसे भरा’ योजनेअंतर्गत कंत्राटदारचलित प्रकल्पांचा भडिमार केला आहे. अर्थसंकल्पात अनेक महापुरूष, संत-महात्म्यांची नावे घेण्यात आली आहेत. सरकारच्या ढासळत्या प्रतिमेला सावरण्यासाठी लोकभावनांना हात घालण्याचा हा प्रयत्न आहे. महापुरूष व संत महात्म्यांची नावे घेण्याऐवजी त्यांच्या विचारधारेचे अनुकरण केले तर ते महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या अधिक हिताचे ठरू शकेल.
लवकरच लोकसभा निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पक्ष, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कारभारला जनता कंटाळलेली आहे. ही जनता निवडणुकीची वाट पहात आहे, निवडणूक लागताच जनता या ट्रिपल इंजिन सरकारला त्यांची जागा दाखवेल हे लक्षात आल्यानेच सर्व समाज घटकांना खूष करण्यासाठी वारेमाप घोषणा करण्यात आलेल्या आहेत. या सरकारचा अनुभव पाहता यातील एकही घोषणा पूर्ण होणारी नाही. वास्तविक पाहता अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला चालना देणारा असायला हवा परंतु तो निवडणूक जुमल्यांचा निघाला, असेही वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
