…म्हणून कंत्राटदार मित्रांच्या टेंडरवर धडाधड सह्या
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी:
भाजपाप्रणित शिंदे सरकारने वर्षभर फक्त घोषणाबाजी आणि इव्हेंटबाजी केली आणि आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच कोट्यवधी रुपयांच्या कामासाठी अंदाजपत्रक आणि टेंडर प्रक्रियेची धावपळ सुरू केली आहे. शिंदे सरकारने नेमलेल्या महापालिका प्रशासकाच्या बदलीचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत, या निर्देशामुळे बदली होण्याआधी प्रशासकाकडून आपल्या कंत्राटदार मित्रांच्या फायली तडकाफडकी मंजूर करण्याचा ‘बंदोबस्त’ केला जात आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा समाचार घेत वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, महानगरपालिकेने वर्षभर विकास निधी खर्च केला नाही आणि आता लोकसभा निवडणुक आचार संहितेच्या तोंडावर टेंडर काढण्याचा धडाका लावला आहे. मुंबई महानगरपालिकेने १० दिवसांत १५० कोटी रुपयांची ९०० टेंडर मंजूर केली आहेत. मालाड व कांदिवली भागात सर्वात जास्त म्हणजे २९२ टेंडर मंजूर करण्यात आली आहेत. घाईघाईने टेंडर पास करण्याची ही कृती आर्थिक मर्यादेचा भंग आहे तसेच आगामी निवडणुकीच्या ‘मॅनेजमेंट’साठी करदात्या मुंबईकरांच्या पैशाची ‘लूट’ आहे.
दोन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे, सरकार या प्रशासकाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांच्या लोकांचीच कामे करत आहे. विरोधी पक्षांच्या वार्डातील कामे केली जात नाहीत, त्यांच्या वार्डातील विकास कामांसाठी निधी दिला जात नाही. सरकार जाणीवपूर्वक दुजाभाव करत आहे. मुंबईकर जनतेच्या पैशांची लुट सुरु आहे. सत्ताधारी भाजपा, शिंदे शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत मुंबईकर याचे चोख उत्तर देईल, असेही वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
