रेल्वेच्या जमिनीवर धारावीकरांचे पुनर्वसन नको.
मुंबई, दि. २५ फेब्रुवारी;
धारावीतील मोदानी पुनर्विकास प्रकल्प हा धारावीकरांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे. धारावीकरांना मुळ जागेवरुन हुसकावण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र आहे, त्याला धारावीकरांचा तीव्र विरोध आहे. रेल्वेच्या जागेवर ज्या इमारती उभ्या राहतील त्यातील रहिवाशांना पूर्ण मालकी हक्क कधीही मिळू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. धारावी पुनर्विकासबाबत ही खूपच धक्कादायक असून पुनर्वसन इमारती रेल्वेच्या जागेवर बांधण्यात येऊ नयेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे. त्याचबरोबर रेल्वे वसाहतीतील कुटुंबांचची कायमस्वरूपी पुनर्वसन योजना जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत रेल्वे वसाहती सुद्धा इतरत्र स्थलांतरित करू नये, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
धारावी प्रकल्पावर बोलताना प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, आम्ही वारंवार सांगत आलो आहोत की धारावीतील मोदानी पुनर्विकास महाघोटाळा प्रकल्प धारावीकरांचे हक्क पायदळी तुडवत आहे. या महाघोटाळ्यामुळे ७ लाखांहून अधिक धारावीकरांना धारावीतून हलवण्याचा कट रचला गेला आहे. ज्यांना ‘पात्र’ म्हणून धारावीतच पुनर्वसन करण्यात येणार आहे त्यापैकी अनेकांना पूर्ण मालकीचे घर मिळू शकणार नाही. २० फेब्रुवारी २०२४ रोजी रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (RLDA) ने धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून हे स्पष्ट केले की, अदानी-प्रणित धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा.लि. (DPPL) प्रकल्पासाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेच्या जागा पोटभाडेपट्ट्याने देता येणार नाहीत. याचाच अर्थ या कुटुंबांना मालकी हक्काचे घर मिळणार नाही व त्यांना बेघर करण्याचा हा डाव आहे, हे आम्ही कदापी सहन करणार नाही. रेल्वेच्या जागेवर अदानीला काय बांधायचे ते बांधावे परंतु स्थानिक धारावीकरांचे पुनर्वसन मात्र त्या जागेवर करु नये.
धारावी प्रकल्प हा इतिहासातील सर्वात मोठा जमीन घोटाळा आहे. ज्यांनी आपल्या मेहनतीतून, कष्टातून आणि एकजुटीतुने धारावी नावारूपास आणली त्या धारावीकरांच्या हक्कांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. मोदानी मॉडेल धारावीच्या विकासाबाबत अजिबात नाही तर हे फक्त आणि फक्त अदानींची भरभराट करणारे मॉडेल आहे, याला धारावीकरांचा कडाडून विरोध आहे. धारावीतील एकाही व्यक्तीला आम्ही स्थलांतरित होऊ देणार नाही. रेल्वेच्या जमिनीच्या भागावर पुनर्वसन घटकाचे नियोजन करू नये, असे वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले आहे.
