मुंबईतील लोकसभेच्या ६ ही जागा जिंकू!
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी:
लोकसभा निवडणुकीला ५० दिवसही शिल्लक राहिले नाहीत. भाजपा सरकार मध्ये लोकशाही व संविधान कुठे दिसत नाहीत. भाजपा सरकारने यंत्रणाचा कितीही गैरवापर केला, पैसा वाटला तरी महाविकास आघाडी मुंबईतील लोकसभेच्या सहाच्या सहा जागेवर विजयाची झेंडा फडकवेल, असा विश्वास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई दक्षिण व दक्षिण मध्य जिल्हा कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभात त्या बोलत होत्या, काँग्रेसने अनेकांना भरपूर दिले आहे, ओळख दिली ते नेते पक्ष सोडून गेले पण कार्यकर्ते मात्र काँग्रेस बरोबर आहेत आणि हीच आपली ताकद आहे. जनता काँग्रेसच्या सोबत आहे परंतु आपल्याला त्यांच्यापर्यत गेले पाहिजे.
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, मुंबई राजधानी आहे, मुंबईने पुढाकार घेतला पाहिजे, मुंबई येणाऱ्या काळात राज्याला व देशाला दिशा देऊ शकले. चंद्रकांत हंडोरे हे संघर्षातून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत. सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसमध्ये ‘देर है पर अंधेर नही’. ही मुंबई काँग्रेसची आहे आणि या मुंबईवर काँग्रेसचा तिरंगा फडकवायचा आहे तसेच महाराष्ट्राच्या मंत्रालयावरही तिरंगा झेंडा फडकल्याशिवाय गप्प रहायचे नाही. राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देश पिंजून काढला तो केवळ तुमच्या आमच्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, देशाच्या ऐक्यासाठी, भारताच्या भवितव्यासाठी, संविधानासाठी ही यात्रा काढली आहे.काँग्रेसचे भविष्य महाराष्ट्रात उज्ज्वल आहे. मुंबईत जी मेट्रो सुरु झाली त्याचा पायाभरणी कार्यक्रम पंतप्रधान मनमोहनसिंह व विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाला. शिवडी-न्हावा सेवा सी लिंक प्रकल्प विलासराव देशमुख यांची त्याला चालना पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मुंबईचा कायापालट हा काँग्रेस सरकारने केला आहे. मुंबईची अस्मिता महत्वाची आहे ती सर्वसामान्य जनतेमध्ये जागृत करावी लागणार आहे असे देशमुख म्हणाले.
