शिवाजी महाराजांच्या गड, किल्ल्यांचे जतन करू..

0
IMG-20240219-WA0011

पुणे, दि. १९ फेब्रुवारी :

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील पाण्याचा प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्याकाळी दाखवली. पर्यटन विभागाने हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विभागाचे त्यांनी अभिनंदन केले.

अखंड हिंदुस्थानचे अभिमान, दैवत आणि लोकशाहीचा कारभार साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत झाला. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते.

शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही ते म्हणाले.

मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. आग्र्याला देखील दिवाणे आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करतो, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *