सर्वसामान्यांना वेळेत आवश्यक आरोग्यसेवा द्या..

0
IMG-20240217-WA0079

नाशिक, दि. १८ फेब्रुवारी :

सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही गरजू व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

येवला उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या सी. टी. स्कॅन मशीनचे लोकार्पण भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, या समारंभात ते बोलत होते. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आज लोकार्पण करण्यात आलेल्या साधारण साडेचार कोटींच्या सी. टी. स्कॅन मशीनमुळे अनेक दुर्धर आजारांचे निदान होण्यास मदत होणार आहे. अतिगंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यकता भासल्यास खाजगी विशेष तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.

 

या उपजिल्हा रुग्णालयात अतिशय उत्तम व आधुनिक पद्धतीचा अतिदक्षता विभाग असून नव्याने 20 खाटाच्या ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यास देखील मान्यता मिळाली आहे. याचप्रमाणे या रुग्णालयात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी 15 कोटींच्या नवीन निवासस्थान इमारतीला मान्यता प्राप्त झाली आहे.या कामांना लवकरच सुरवात होणार आहे.यासर्व सुविधांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रुग्णालयाचे मुख्य गेट दुरुस्त करून घेऊन रुग्णालयाचा बाहेरील परिसर स्वच्छ ठेवून त्यामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असे ही यावेळी भुजबळ यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भुजबळ यांनी उपजिल्हा रुग्णालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी केली. यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सिटीस्कॅन मशीन चे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस शैलजा कुप्पास्वामी यांनी सांगितले, या सी.टी. स्कॅन मशीनचे काम हे क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्याकडे सात वर्षांसाठी देण्यात आले आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. तर बाहेरील रुग्णांसाठी माफक दरात सी. टी. स्कॅनची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *