‘बापचोर, गद्दार’ हा टॅग पुसला जाणार नाही.
मुंबई, दि १७ फेब्रुवारी:
‘गद्दारांनी आता सुद्धा काहीतरी रडारड केली पण तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर ही टैगलाइन कधीच पुसली जाणार नाही’. शिवसेना, शिवसैनिक आणि जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या “महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र !”च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात झंजावात सुरू आहे. मुंबईत लालबाग विभाग क्रमांक ११ येथे आदित्य यांची तोफ धडाडली. या सभेला शिवसैनिक आणि मुंबईकरांनी मोठी गर्दी केली , संपूर्ण लालबाग शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता.
सभेला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, प्रकल्प गुजरातेत पळवतायत, मुंबईच्या रक्ता रक्तात क्रिकेट असताना वर्ल्डकप फायनल कुठे झाली तर गुजरातला. जर ती मॅच इथे मुंबईत झाली असती तर आज निर्णय वेगळा असता पण महाराष्ट्राच्या विकासाशी देणं घेणं नाही . सगळं गुजरातला पाठवलं जातंय. याला आमदार बनवू याला खासदार बनवू पण तरुणांचे काय, त्यांच्या रोजगाराचे काय ?
देशभरात आणि राज्यभरात सरकारकडून शिवसैनिकांवर केंद्रीय आस्थापनांच्या दबाव तंत्रावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना आवाहन करताना म्हटलं की ‘आज या गद्दारांच्या विरोधात किशोरी पेडणेकर, राजन साळवी, सूरज चव्हाण लढत आहेत, संजय राऊत तर जेलमध्ये जाऊन आले. आता तर ते कोणाला घाबरत नाहीयेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. उद्या तुमच्या घरी सुद्धा त्यांचे ED, CBI घेऊन येतील पण आपण घाबरायचं नाही, आपण एक होऊन मुंबईकर होऊन लढायच आहे” असं ते म्हणाले.
आजच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या बोटचेपी धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले की मला तर भाजपाच्या कार्यकर्त्यांविषयी वाईट वाटतय कारण आता ज्या काही नेत्यांना पद दिले आहेत त्यातले अनेक बाहेरचे आहेत. मी तर राहुल गांधी यांना सल्ला देईन की तुम्हाला पंतप्रधान बनायचं असेल तर, तुम्ही भाजपा मध्ये जा. कारण तिथे सर्व काँग्रेसवालेच आहेत. आता भाजपचा नारा बदलला आहे ‘दाग अच्छे है’, वाशिंग पावडर भाजपा’ अशी झालीये. जेवढे गद्दार, भ्रष्टाचारी आहेत ते सर्व भाजपमध्ये आहेत.
सध्याचे सरकार केवळ इतिहासात काय झाले त्यात अडकून पडले आहे पण आपण मुंबई महाराष्ट्र आहोत आपण भविष्यावर काम करणारी लोकं आहोत, सध्याचे सरकारकडून सगळे उद्योग गुजराथ मध्ये पाठवले जात आहेत. यांच्या फक्त टॅगलाईन बदलत असतात परिस्थिती तीच राहते. ‘अब की बार ४०० पार आणि वैगरे वैगरे’. फक्त निवडणुका आल्या की घोषणा बदलतात कामं होत नाहीत, असे म्हणत सरकारला आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरलं ..
