ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्ष व चिन्हही दुस-याला देऊन टाकले..
पुणे दि. १८ फेब्रुवारी;
आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामती मतदारसंघात वर्षीनुवर्षे लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला काही भावनिक आवाहन करण्याची गरज वाटत नाही. परंतु, विरोधकांची भाषण करण्याची पद्धत काहीतरी वेगळंच सुचवत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, पक्षा संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून असा निर्णय होईल अशी खात्री होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही आणि ती ठेवतील असही वाटत नव्हतं. दोन्ही बाजूंची पात्रता अशा प्रकारचा निर्णय त्यांनी आधी देखील घेतला होता. शिवसेनेबाबत जो निर्णय घेतला होता त्याच निर्णयाची पुनरावृत्ती केली. पक्ष आणि चिन्ह या दोन्हींची भूमिका निवडणूक आयोग आणि अध्यक्षांनी घेतली. आमच्या मते आम्हा लोकांना न्याय मिळाला नाही. यात पदाचा गैरवापर कसा होतो हे यातून दिसून आले. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत. विधानसभा अध्यक्षांचा निकाल आम्हा लोकांना न्याय देणारा नाहीच आहे, पण पदाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण देशासमोर देण्यासंबंधीचा हा निर्णय आहे. आणि त्याला पर्याय आम्ही सुप्रीम कोर्टात हे प्रकरण दाखल केलेले आहे. आमची सुप्रीम कोर्टाला विनंती असणार आहे की, निवडणुका जवळ आल्या असल्याने लवकरात लवकर निर्णय द्यावा.
शरद पवार म्हणाले की, पक्षातून लोक सोडून जातात, नवे येतात. या गोष्टी घडत असतात, मात्र असं कधी घडलेलं नाही की ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्हही देऊन टाकलं. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरुन आहे असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे. चिन्ह गेलं तरीही त्याची चिंता करायची नसते. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्हं वेगवेगळी होती. पहिल्यांदा बैलजोडी होती, नंतर गाय-वासरु आलं, त्यानंतर चरखा हे चिन्ह आलं, त्यानंतर हाताचं चिन्ह आलं. त्यानंतर घड्याळ आलं. वेगळी चिन्हं आपण पाहिली आहेत. त्यामुळे कुणाला असं वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचं अस्तित्व संपेल तर असं घडत नसतं. सामान्य माणसांशी संपर्क वाढवला पाहिजे. त्यांना नवं चिन्ह काय आहे ते पोहचवलं पाहिजे इतकंच महत्त्वाचं आहे.
निवडणुकीत मतदारांची साथ मागणं उमेदवाराचा अधिकार आहे. पण, कुटुंबातील सगळे लोक एका बाजूला आणि मीच एकटा पडलोय असं सांगणं म्हणजे भावनात्मक भूमिका मांडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे असेही शरद पवार म्हणाले.
देशाच्या पार्लमेंटमध्ये भाजपचे बहुमत आहे. भाजपचे बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाशी जर चर्चा केली, तर ते सुद्धा धनगर किंवा अन्य जे घटक आहेत त्यांच्यासाठी प्रस्ताव आणत असतील, तर त्यावर साथ आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. एक वेगळी भूमिका कोर्टात मांडणे, जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्यासंबंधीची जबाबदारी भाजप सरकारने घेण्याची आवश्यकता होती, पण ती न घेतल्यामुळे धनगर समाजाबाबत हा निकाल लागलेला आहे. एक प्रकारे त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे .
अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की, आम्हाला फोन येतात, दमदाटी केली जाते. या सर्व गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या, या पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये जो कालखंड गेला, त्यानुसार कितीतरी वर्ष अधिक जितेंद्र आव्हाड हे पक्षासाठी काम करतायंत. त्यांनी देश पातळीवर तरुणांचं नेतृत्व, महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील काम केलेले आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली असे नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं हे अन्य लोकांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही.
लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी गाजवत असेल, तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काही कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांसमोर मांडावी. ५५-६० वर्ष आम्ही काय काम केलं हे लोकांना माहिती आहे. इथे उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कित्येक वर्षांपासून आहे. या संस्था ज्या काळात स्थापन झाल्यात त्या काळात आज आरोप करणारे, काय वयाचे होते याचे गणित मांडले तर त्यांच्या लक्षात येईल की, या प्रकारची भूमिका मांडणे कितपत योग्य आहे आणि म्हणून कोणी उभं राहत असेल तर त्याला जरूर अधिकार आहे असे पवार म्हणाले.
पुरंदर तालुक्यातील सर्व लोकांना माहित आहे, कुणी काय केलेले आहे. जे सत्तेत आहे त्यांनी हे आम्हीच केलं ही भूमिका घेतली तर त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. समोरच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. ज्यांचा कार्यकाळ अजून ४-५ वर्ष बाकी आहे, अशा उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली हा आश्चर्यकारक निर्णय आहे असेही शरद पवार म्हटले.
अलीकडच्या काळात काही यंत्रणा या अतिशय महत्त्वाच्या झालेल्या आहेत. अँटीकरप्शन, ईडी, सीबीआय या अशा आणखी काही संस्था आहेत. या सर्व संस्था किती प्रभावी आहेत. राज्यकर्त्यांवर किंवा राजकारणात असलेल्या विरोधी लोकांवर त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, याची उदाहरणे हल्ली पाहायला मिळतात आणि तीच उदाहरणे पक्षांतराच्या संबंधीची भूमिका जे लोक करत आहेत, त्याचं कारण त्यांची व्यवस्था तिथे जोडलेली आहे असेही शरद पवार म्हणाले.
