प्रत्येक पिढीचा हुंकार मांडणारा मानवतावादी शायर..
प्रत्येक पिढीचा हुंकार मांडणारा मानवतावादी शायर..
मुंबई, दि. १८ फेब्रुवारी:
पाच दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. आतापर्यंत साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके, पद्म भूषणसह मानाचे अनेक पुरस्कार मिळाले. यात आता साहित्यातील सर्वोच्च मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. दमदार गीतांतून प्रत्येक पिढीचा हुंकार पोचवणाऱ्या गुलजार यांनी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे.
फाळणीनंतर भारतात आलेल्या गुलजार यांनी त्या जखमांना आपल्या तरल शब्दातून वाट करून दिली. या काळात मनात कटुता वा विद्वेष न ठेवता त्यांच्या विचार आणि शायरीने मानवतावाद कधी सोडला नाही. उर्दू कवी, शायर, गीतकार म्हणून अनेक पिढ्या समृद्ध केल्या. इथली उर्दू भाषा तिची नजीकच गुलजार सारख्यांनी जीवंत ठेवली. सत्तरच्या दशकातली पिढी त्यांच्यावर जेवढं प्रेम करत होती तेवढंच प्रेम आजची पिढीही करते आहे. गुलजार यांचे संयत सूरातले टोकदार आणि कोरीव शब्द ऐकणे म्हणजे स्वर्गीय आनंद असतो. आंधी, माचिस सारख्या चित्रपटातून सडेतोड राजकीय विधानं करतानाच माणसांच्या मनातली आंदोलनं, त्यांची स्वप्न आणि ती मोडताना होणारी गहरी जखम दाखवणारा हा कवी आहे.
मृत्युला हसत हसत सामोरा जाणारा ‘आनंद’ चित्रपट गुलजार यांच्या लेखनीतून अवतरला. “बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही।” हा आनंद मधील नायकाचा संवाद आजही तितकाच आठवणीत राहतो. मिर्झा गालिब सारखी टीव्ही मालिकाही गुलजार यांनी केली. ‘छोड़ आए हम वो गलियां, ‘गोली मार भेजे में, भेजा साला शोर करता है.’ पासून ‘बिडी जलईले जिगर से पिया’ ते ‘दिल तो बच्चा है जी’ पर्यंत लहान मुले ते वयस्कर लोकांसाठीची सर्व प्रकारातील गीतलेखन गुलजार यांनी केले आहे. लहान मुलांसाठी बनवलेला ‘मासूम’ चित्रपटातील ‘लकडी की काठी, काठी का घोडा’ अशी विविध प्रकारातील गीतलेखन गुलजार यांनी केले. गुलजार यांनी गाणी, चित्रपट, शायरी, कविता, कथा यामधून चित्रपट व साहित्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. गुलजार यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आणि यातून या पुरस्कारांचीच उंची वाढली.या प्रवासात त्यांना ‘स्लमडॉग मिलेनियर’च्या गीतलेखनासाठीचा ‘ऑस्कर’ही मिळाला.
आपल्या कवितेनं संपूर्ण भारतीय समाजाशी जोडलेल्या या कवीला ज्ञानपीठ मिळाले हा त्यांचा सन्मान आहेच मात्र यामुळे ज्ञानपीठाचाही सन्मान झाला आहे. गुलजार यांच्या लेखनीचा झरा कधीच आटू नये. त्यांच्या हातून अधिक दर्जेदार कवितांची निर्मिती होवो आणि त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो, असे प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
