मोदींच्या नेतृत्वाखाली NDA चे सरकार येणार..
मुंबई दि. १६ फेब्रुवारी –
आमची महायुती एकदम घट्ट असून चांगले काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये परत एनडीएचे सरकार येणार आणि ४०० पार टप्पा गाठणार असल्याचा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्रात अनेक चुकीचे व दिशाभूल करणारे सर्व्हे येत आहेत तरीही आम्ही महाराष्ट्रात ४५ जागा महायुतीच्या माध्यमातून जिंकणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार असल्याची खात्री प्रफुल पटेल यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार प्रफुल पटेल यांनी विधान भवनातील निवडणूक कार्यालयात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज खासदार म्हणून टर्म सुरू असताना दाखल केला आहे. त्यामुळे काही लोक तर्कवितर्क लावत आहेत. मात्र काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या. आम्ही राजकीय जीवनात काम करत असताना काहीना काही घडामोडी कराव्या लागतात. त्यामुळे येणारा काळ तुम्हाला आम्ही आज अर्ज का दाखल केला आहे हे स्पष्ट करेल असेही प्रफुल पटेल म्हणाले.
मला खात्री आहे की निवडणूक बिनविरोध होणार आहे. आमची रिक्त जागा आमच्याकडेच राहणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट दिसेल असेही प्रफुल पटेल यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
