अशोकराव दबावामुळे किंवा स्वार्थासाठी भाजपात गेले:

0
20220916_171119

मुंबई, दि. १३ फेब्रुवारी;

अशोक चव्हाण हे विचाराचे पक्के आहेत, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, केंद्रात विविध खात्याचे मंत्री अशी संधी दिली. असे असताना ते भाजपात गेले याचा अर्थ त्यांच्यावर दबाव असावा किंवा स्वार्थासाठी ते भाजपात गेले असावेत, असा आरोप विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला सुरु होता… टाईमिंग चांगले नाही..अनेक लोक पक्ष सोडत आहेत परंतु जनता जागृत आहे, ती भाजपाला धडा शिकवेल. महाविकास आघाडी मजबूत असून विधानसभेला विजय मिळून मविआचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली पण भाजपात त्यांना ती संधी मिळणार नाही, आता त्यांना मागील रांगेत बसावे लागेल. भाजपा अनेक प्रयत्न करूनही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकत नाही हे त्यांच्याच सर्वेत दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली आहे. त्यामुळे ते त्यांची व पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. १५ तारखेला काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आहे त्यानंतर १६ व १७ तारखेला लोणावळ्यात शिबीर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी भाजपात जाऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. भाजपाच्या राजकारणाला जनता कंटाळली असून जनताच यांची डोकी फोडेल. त्यांच्या जाण्याने आभाळ कोसळले नाही, नेते गेले म्हणजे कार्यकर्ते जात नसतात, असेही वडेट्टीवार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *