महाराष्ट्रातील सरकार ED, CBI ने निवडून दिलेले:
मुंबई, दि. ११ फेब्रुवारी:
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला व काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा पराभव करुन काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
टिळक भवन येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रातील भ्रष्ट युती सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृहमंत्र्यांचे आहे परंतु “गाडीखाली कुत्रा आली तरी विरोधक राजीनामा मागतील” असे विधान त्यांनी केले. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंवर हल्ला करण्यात आला, नागपुरात खून, मुंबईत गोळीबाराच्या घटना घडल्या, जनता भयभीत आहे परंतु सरकार, मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री उत्तर देण्यास तयार नाही. गुन्हेगारांवर कारवाई केली जात नाही, महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत खराब आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
