महाराष्ट्रात कायद्याचे धिंडवडे, CM/DCM पदमुक्त व्हा…
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी :
भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारा भाजप आमदार, विरोधकांचे हात – पाय तोडा, असे सांगत ‘सागर’ बंगल्यावर आपला ‘बॉस’ बसला आहे, असे उघडपणे बोलणारा सत्ताधारी आमदार, या सगळ्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात गुंडाना बळ मिळाले आहे. सत्ताधारी नेतेच कायदा – सुव्यवस्था हातात घेत असल्याने गंभीर परिस्थिती ओढवली आहे. या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पदमुक्त व्हायला हवं, अशी संतप्त मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.
कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्येच एका लोकप्रतिनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधीवर गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. मुंबई व महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजरोस खून, दरोडो, बलात्काराच्या घटना घडत असताना गृहमंत्री मात्र राजकीय तोडफोडीत व्यस्त आहेत. महाराष्ट्राला एवढा निष्क्रीय गृहमंत्री कधीच लाभला नव्हता. पोलीसांवर गृहमंत्र्यांचा वचक नसून गुन्हेगार मोकाट सुटलेत, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात लौकिक राहिला आहे, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्ड शी तुलना केली जात होती पण हा लौकिक व पोलिसांचा दरारा भाजपा प्रणित शिंदे सरकारच्या राज्यात रसातळाला मिळाला आहे. कल्याणचे प्रकरण आपसातील वाद होता असे सांगून पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला, आजही तेच होत आहे परंतु प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा आहे. महाराष्ट्रात आज जंगलराज सारखी परिस्थिती झाली आहे. कोणीही उठतो आणि थेट गोळ्या झाडतो, गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिली नाही. गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळाल्यानंतर हेच होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांचा शासकीय वर्षा बंगला, मंत्रालय येथे गुन्हेगार बिनधास्तपणे वावरत आहेत. काही लोकप्रतिनिधी कुख्यात गुंडांच्या घरी जाऊन त्यांचे निर्ल्लजपणे समर्थन देत आहेत, यातून गुन्हेगारांचे मनोधैर्य आणखीच वाढेल.
भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार करूनही पक्षाने या आमदारांवर कारवाई केलेली नाही. या गुंडगिरीला भाजपने पोसलंय असं चित्र आहे. यामुळे गुन्हेगारीचं समर्थनच होत असून गुंड चेकाळले आहेत. राज्यात रिव्हॉल्व्हरचे वाटपच सुरु असल्याच सांगितल जात. मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांच्या बंगल्यावर मध्यरात्री पर्यंत कोणकोण भेटत असत याची चर्चा लोकात आहे. गुंडासोबतचे फोटो बिनदिक्कत समाज माध्यमांवर झळकताहेत, ही राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
