खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा..
मुंबई, दि. ६ फेब्रुवारी:
समाजात साहित्याचे स्थान हे कायम आदरणीय आणि पूजनीय राहिले असून खान्देशला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवताना डोळ्यांनाही ताण पडला त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्याने उपस्थिती देऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी साहित्यिक व कादंबरीकार यांना राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आजसारखे पोषक वातावरण व संधी त्यांना कधी उपलब्ध होणार नाही, असे सूचक वक्तव्य करत राजकारणावर लिहिण्याचे सांगितले.
साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री यांनी उपस्थिती द्यावी ही प्रथा व संस्कृती आहे, मात्र नाईलाज असल्याने आपण खानदेशातील या मराठी साहित्य संमेलनाला अनुपस्थित राहिलो. खानदेशातील साने गुरुजी, कवयित्री बहिणाबाई चौधरी या महान विभूतींचा स्पर्श झालेला आहे व त्या ठिकाणी मराठी भाषेचा कुंभमेळा भरला होता. अमळनेर येथे ९७वे साहित्य संमेलन पार पडत असताना शंभरावे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर भव्य दिव्य आयोजित केले जाईल. महाराष्ट्र शासन शंभराव्या साहित्य संमेलनाला परिपूर्ण सहाय्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली व यावेळी आपले सरकार राहील, असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले.
खानदेशभूमीमधील विशेषतः जळगाव व अमळनेर या ठिकाणी वाल्मीक ऋषि, महर्षी व्यास, संत सखाराम महाराज व अनेक संतांनी स्पर्श झालेली भूमी आहे. यातच वाल्मिक ऋषी यांचे नाव अयोध्येचे विमानतळाला देऊन खानदेश व अयोध्या यांची एक नाळ जोडली गेल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी समारोप भाषणात केला.
साने गुरुजी यांच्या विचारांची परंपरा असून त्यांचा पदस्पर्श या भूमीला लाभलेला आहे. मराठी साहित्याची सर्व समाजाला जाग आणणारी आहे. आपण आपल्या साहित्यातून ती ओळख करून देत असतो, असे प्रेरणा देणारे साहित्य संमेलन बळ देण्याचे काम करीत असतात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथाला विशेष अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले व तालुक्याच्या ठिकाणी साहित्य च्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहनही दिले जाईल व जिल्हा महामंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले व त्याचा प्रचार, प्रसार होईल, असेही ते म्हणाले. अमळनेरला असलेले शंभर वर्ष जुने तत्त्वज्ञान केंद्र आहे. या केंद्राचा प्रस्ताव पाठवल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याचा सकारात्मक विचार करेल, असे शेवटी त्यांनी सांगितले व शेवटी त्यांनी साहित्यकरांना सांगितले की, राजकीय कादंबरी लिहिण्याचे आजचे वातावरण सगळ्यात चांगले आहे व साहित्यिकांना ही संधी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
