नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी पुढील वर्षापासून.
मुंबई, दि. २ फेब्रुवारी :
पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
जुहू येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या वतीने आयोजित नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी चर्चा सत्रात मंत्री पाटील बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम क्रेडिट फ्रेमवर्क (NCrF) स्वीकारून 2023-24 पासून अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास २०० स्वायत्त महाविद्यालय आणि १७०० पदवीत्तर सेंटरचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाबाबत राज्य शासनाने अग्रह धरला आहे. यामध्ये काही शिथिलता आणण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सोबत चर्चा करून नोंदणीची रक्कम कमी करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्र नॅक मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत अव्वल स्थानावर आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून राज्यातील सर्व महाविद्यालयात धोरणांची अंमलबजावणी करावीच लागेल असे निर्देश पाटील यांनी दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुनील बी भिरुड यांची कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याबद्ल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
