ईडी चौकशीच्या विरोधात NCP करणार घंटानाद..
मुंबई दि. ३१ जानेवारी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांची उद्या १ फेब्रुवारी रोजी ईडी कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी केंद्र सरकार विरोधात घंटा नाद करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित दादा पवार यांची २४ जानेवारी रोजी ईडी कडून १० तास चौकशी करण्यात आली होती. ईडी कडून रोहितदादा यांना पुन्हा उद्या एक फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन आणि घंटानात आंदोलन करण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते शासकीय कार्यालयासमोर घंटा नाद आंदोलन करण्यात येणार आहे असे विद्या चव्हाण म्हटल्या.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं असताना देखील नोटिसा बजावण्यात येत आहे. देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर लोकशाही असेल आणि हुकूमशाही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात शिंदे सरकारने जाहीर केली नसेल तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे.
ईडीच्या वतीने विरोधात असलेल्या लोकांविरोधात कारवाई करण्यात येत होती. मात्र नंतर भाजप सोबत सत्तेत सहभागी झालेल्या यामिनी जाधव, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी या लोकांच्या चौकशीच काय झालं. यामध्ये २० ते २२ जणांची मोठी यादी आहे.या सर्व चौकशा थंड का पडल्या आहेत. या सर्वांनी भाजप समोर गुडघे टेकल्यामुळे आणि भाजप सोबत सत्तेत आल्यामुळे यांच्या चौकशी बंद झालेली आहे. भाजपसोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी जर यांनी भ्रष्टाचार केला होता. तर मग या भ्रष्टाचारी फौजेला मोदी सरकारने आपल्या छत्र छायेत घेतल्यामुळे यांच्या चौकशी बंद झाल्या आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आमदार रोहित पवार भाजपच्या समोर गुडघे टेकत नसल्याने त्यांची चौकशी सुरू आहे असेही विद्या चव्हाण म्हणाल्या.
