अशोक सराफांना ‘महाराष्ट्रभूषण’.
मुंबई, दि. 30 जानेवारी :-
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ देदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हससवलं. मराठीसह हिन्दी कलाक्षेत्रं समृद्ध केलं. मराठीतील ‘सुपरस्टार’ अभिनेता म्हणून म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली. मार्गदर्शन केलं. वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली.
त्यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार एका महान कलावंताचा गौरव आहे. कोट्यवधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वांवर केलेल्या प्रेमाचं हे प्रतिक आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.
अभिनय हे सर्वस्व मानत करोडो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अशोक सराफ हे साक्षात अभिनय सम्राट आहेत, त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड होणे हे महाराष्ट्रासाठी भूषणावह असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे मनस्वी अभिनंदन करीत असल्याचे संदेशात म्हटले आहे.
