ओबीसींच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरा..
मुंबई, दि. २९ जानेवारी;
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावरून ओबीसी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ओबीसी, भटके, विमुक्त, एससी, एसटी आणि इतर सर्व समाजाने या झुंडशाहीच्या संकटाला तोंड देण्यासाठी एकत्र येऊन साथ द्यावी. ओबीसी बांधवांनी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी गट-तट सोडून सर्व ३७४ जातींनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून शक्ती दाखवण्याची वेळ आलेली आहे, मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
भुजबळ म्हणतात की,१ फेब्रुवारी २०२४ रोजी आपापल्या भागातील आमदार, खासदार किंवा तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या सुपूर्द कराव्यात.लाखोंच्या संख्येने बाहेर पडून ही मागणी सर्वांनी मांडावी. सर्व आमदार खासदारांना ओबीसी, भटके विमुक्त हे देखील या राज्याचे नागरिक व मतदार आहेत आणि निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना त्यांचीही गरज आहे, याची जाणीव करून द्यावी. ओबीसी, भटके विमुक्त समाजातील विचारवंत, लेखक, वक्ते, वकील या सर्वांनी आपापल्या परीने या कामामध्ये सहकार्य करावे. वकील बांधवांनी ओबीसींवरील होणारा अन्याय न्यायालयात पटवून दिला पाहिजे. मराठा आरक्षणा संदर्भातील मसुद्यासंदर्भात १६ फेब्रुवारी पर्यंत लाखोंच्या संख्येने हरकती दाखल करण्यात येणार आहेत.
अहमदनगर येथे ३ फेब्रुवारी रोजी ओबीसींचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, त्या मेळाव्याला सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. लवकरच ओबीसींची महाराष्ट्रभर आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे, त्याची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येणार आहे, त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे.
