नितीशकुमार देशातील सर्वात मोठे ‘पलटुराम’..

0
ramesh nitish

लातूर, दि. २९ जानेवारी:

इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक भूमिका बदलली, त्यांनी भूमिका बदलल्याचे आश्चर्य नाही. कारण ते आज एक बोलतात व उद्या दुसरेच बोलतात. राजकारणात विश्वास महत्वाचा असतो तो नितीशकुमार यांनी गमावला असून देशातील सर्वात मोठे पलटुराम झाले आहेत. नितीशकुमार यांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. बिहारमध्ये काँग्रेससह राष्ट्रीय जनता दल एकत्र निवडणुका लढवत आहे आणि केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आणू, असा विश्वास प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

प्रदेश काँग्रेसची मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक लातूरमध्ये संपन्न झाली, त्यावेळी रमेश चेन्नीथला पत्रकार परिषदेला संबोधित करत होते, ते पुढे म्हणाले की, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस पक्षाने मागील निवडणुका एकत्रितपणे लढवल्या होत्या आताही काँग्रेस व राजद मिळून निवडणुका लढवतील व बिहारमध्ये सर्वात जास्त जागी विजय मिळवू. नितीशकुमार यांची विचारधारा काय आहे व आदर्श काय आहेत, हे जनतेला समजले आहे. जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास आहे आणि या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. खासदार राहुल गांधी देशासाठी जे काम करत आहेत त्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्याची गरज आहे. भारत तोडो शक्तीच्या विरोधात राहुल गांधींनी भारत जोडो साठी ४ हजार किमीची पदयात्रा काढली होती आता मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा निघाली आहे. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून भाजपा घाबरले आहे म्हणूनच न्याय यात्रेत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत परंतु राहुल गांधी या सर्वांचा मुकाबला करत जनतेच्या प्रचंड समर्थनासह आगेकूच करीत आहेत, महाराष्ट्रातही न्याय यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करु.

 

विभागीय बैठका आयोजित करुन सर्व जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस एकदिलाने काम करत असून जिल्हा व ब्लॉक स्तरावरही काम सुरु आहे. काँग्रेस हे एक शक्तीशाली संघटन असून ते आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. या आढावा बैठकानंतर १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळ्यात एक शिबीर होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या सर्वात जास्त जागा जिंकेल असा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *