हा काळ संघर्षाचा पण विजय सत्याचा होईल..
मुंबई, दि. २४ जानेवारी:
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवारांबरोबर ईडीच्या कार्यालयापर्यंत गेल्या होत्या.
सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून विजय मिळवू असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेण्याचे काम शरद पवार यांनी सहा दशके केले आहे. आमच्या लढाईत दुर्दैवाने अनेक तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. संसदेचा डेटा सांगतो की, ९५ टक्के केसेस ईडी, प्राप्तिकर विभागाचे सर्व केसेस विरोधकांवर आहेत. स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे त्यामुळे रोहित पवारला नोटीस येणे ही फार आश्चर्यची गोष्ट नाही. रोहित पवारने मोठी संघर्ष यात्रा काढली होती. तो राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी, शोषित, पीडित आणि वंचितांसाठी काहीतरी करू पाहतो. कदाचित हे सूडाचे राजकारण असू शकते अशी भावना लोकांमध्ये आहे.
हे शक्ती प्रदर्शन नाही,सर्व गोष्टी या शक्तीने होत नाहीत,यात प्रेम आणि नातीही असतात. रोहित पवारांनी महाराष्ट्रातील युवापिढीसाठी काम केले आहे. त्यामुळे रोहित पवारांबद्दल लोकांच्या मनात प्रेम आणि आस्था आहे. आपला हा भाऊ लढत असेल तर त्यासाठी येथे यावे यात गैर काय आहे? या देशात अजूनही लोकशाही आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
