मुंबई, दि. ८ सप्टेंबर २०२०:
शिवसेनेशी पंगा घेणारी अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणी वाढत आहेत. मुंबई महानगरपालिकेने कंगनाचे ऑफिस सील केल्यानंतर आता तिच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी होणार आहे. कंगनावर ड्रग्स घेत असल्याचा आरोप असून त्याची चौकशी मुंबई पोलीस करेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री देशमुख म्हणाले की, कंगना ड्रग्ज घेते आणि ते घेण्यासाठी मलाही बळजबरी करते असे अध्ययन सुमनने एका मुलाखतीत दावा केला आहे. अध्ययन सुमनच्या या वक्तव्याच्या आधारे ही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी मुंबई पोलीसही लक्ष घालतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे सुनिल प्रभू व प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या जुन्या मलाखतीची कॉपी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. विधानसभा व विधान परिषदेतही कंगणाची मुक्ताफळं व तीच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
कंगणा विरोधात हक्कभंग...
मुंबई विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात काँग्रेसने विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हा प्रस्ताव मांडला. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करुन मुंबईची बदनामी केल्याचे सांगत भाई जगताप यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. हक्कभंग समितीच्या अनुपस्थितीत मी स्वत: यावर निर्णय घेईन, असे निंबाळकर यांनी सांगितले.
‘गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असेही ती म्हणाली होती. त्यावरून शिवसेना, मनसेसह राज्यातील सत्ताधारी पक्षांनी तिच्यावर सडकून टीका केली.