20200908_164215

मुंबई, दि. ८ सप्टेंबर २०२०:

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. करोनाची स्थिती आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा त्यांनी समाचार घेतला. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील कारभाराची त्यांनी अक्षरशः पिसं काढली. जम्बो कोविड सेंटर आरोग्यासाठी आहेत की कुणालातरी लाभ देण्यासाठी? बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये काय चाललंय? तिथे ३७ टक्के मृत्यूदर आहे. असा दर जगात कुठेही नाही, कोणी बघतेय का त्याकडे असा सवाल त्यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले, जम्बो कोविड सेंटर ही कोणाला लाभ व्हावा यासाठी उभारली आहेत का? त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला हे वारंवार बाहेर आले आहे.  मुंबई व  पुणे शहरातच या जम्बो कोवीड सेंटरचे उधाण आले आहे. ही शहरे महत्वाची आहेत पण औरंगाबाद, नाशिक, नागपूर ही शहरे महाराष्ट्रातच आहेत हे सरकारला सांगावे लागेल काय, विदर्भ-मराठवाड्यात नागरिक राहत नाहीत का? तेथे राहतात ती काय माणसे नाहीत काय? दुसर्‍या कोणत्याही शहरांना कोणतीही मदत का नाही? असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.

मुंबईत कोरोनाच्या चाचणा कमी केल्या जात आहेत. महाराष्ट्रात सातत्याने २० टक्के संसर्गदर असून देश व इतर राज्यांपेक्षा तो कितीतरी अधिक आहे. काल  या संसर्गाचा दर २५ टक्के होता, ही स्थिती भयावह आहे. कोरोनाने महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान घातले आहे. देशातील एकूण मृत्यूंपैकी 38 टक्के मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. अनेक शहरांमध्ये अतिशय भयावह स्थिती.

सरकार कोरोनाची जी स्थिती दाखवत आहे त्यापेक्षा चित्र वेगळे आहे. मुंबईत आपण 7500 मृत्यू दाखवितो आहोत पण, प्रत्यक्षात 15 हजार मृत्यू झाले आहेत. राज्यात केवळ 9000 लोकांना महात्मा फुले जनारोग्य योजनेचा लाभ मिळाला. गरिबाला कुठलीही मदत नाही, त्याच्यावर मरणाची वेळ आली आहे.20-20 लाख रूपये कोरोना पेशंटची बिले लादली जात आहेत. ज्याच्या खिशात पैसे नाहीत त्याला मरणासाठी सोडून देण्यात आले आहे. बेड प्रचंड आहेत असे सांगितले जाते पण तेथे कोणतीही व्यवस्था नाही. मरणाशिवाय या सरकारने कोणताही पर्याय ठेवला नाही, असा घणाघाती हल्ला फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *