नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करू..
मुंबई दि. १८ जानेवारी –
आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही जिजाऊ… सावित्रीबाईच्या लेकी आहात… छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचे राज्य तयार केले तर सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. यांची प्रेरणा घेऊन नवीन मुलींना… तरुण पिढीला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. त्यांनी दिलेला वारसा जपायचा आहे असे आत्मविश्वास निर्माण करणारे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला मेळाव्यात केले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ‘निर्धार नारी शक्तीचा’ हे घोषवाक्य वापरत राज्यस्तरीय भव्य मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
शेती, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रांमध्ये महिला, युवती आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. मी राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना एसटीमध्ये वाहकाबरोबर आता चालकही महिला बनल्या आहेत. वैमानिक बनल्या आहेत. महिलांची रित आहे जे काम करायचे ते चोख करतात अशा शब्दात महिलांचे कौतुक अजित पवार यांनी केले.
प्रत्येक क्षेत्रात निर्विवाद महिला पुढे आल्या आहेत. आता ५० टक्क्यापेक्षा जास्त महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत आहेत. आज पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर काकणभर सरस काम करतात. त्यांच्यापाठी जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा वारसा आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
राज्यातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्याचे महिला धोरण सादर करत असताना कोणत्याही त्रुटी त्यामध्ये राहता कामा नये असे काम महिला धोरण आणताना अदिती तटकरे केले आहे अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे कौतुक केले .
महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. यासाठी कायदा केला त्याला राष्ट्रपतींची अद्याप परवानगी मिळाली नाही त्यासाठी अदिती आपल्याला दिल्लीला जावे लागेल. त्यांना पटवून सांगावे लागेल तेही काम करुया. सत्तेत असताना आपण महिला विकासासाठी भरीव काम केले आहे. मविआमध्ये असताना शक्ती कायदा आणण्याचा प्रयत्न केला असेही अजित पवार म्हणाले.
आपल्याला तिसर्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. महिलांनी जास्तीत जास्त मतदान केले त्यामुळे पाच राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे येणाऱ्या महायुतीच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जायचे आहे.त्यापध्दतीने कामाला लागा. फेब्रुवारीनंतर आचारसंहिता लागेल असेही अजित पवार यांनी सांगितले.
शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण पुढे जात आहोत. एका वेगळ्या विचाराने… राज्याच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत. राज्यात ज्या ज्या वेळी अनेक प्रश्न निर्माण होतात त्या – त्या वेळी आपण सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नुसते भाषणात सांगून फायदा नाही तर कृतीत आणण्याचा प्रयत्नही आम्ही करत आहोत असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने विकास करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहोत. त्याच पद्धतीने आपला महाराष्ट्र पुढे त्यांच्या बरोबरीने गेला पाहिजे असे काम करायचे आहे हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महिलांमध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. महामानवांच्या विचारावर आपल्या राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. त्यात कुठेही यत्किंचितही बदल होणार नाही असा शब्दही अजित पवार यांनी दिला.
मी शब्दाचा पक्का आहे… माझं काम रोखठोक असतं… काम होणार की नाही हे तुम्ही दिलेल्या पत्रातील मजकूर वाचल्यावर समजते त्यामुळे काहींना वाईट वाटते मात्र मी वार्यावर कुणाला सोडत नाही. एकदा निर्णय घेतला की त्यापासून बाजूला जायचे नाही. सर्व घटकांना बरोबर घेऊन वाटचाल करायची आहे. आपला निर्णय पक्षाच्या हिताचा… राज्याच्या विकासासाठी असून राज्याचा अजेंडा तुमच्यासमोर ठेवला आहे. ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावे अशी पक्षाची भूमिका आहे हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आपल्याला राज्यात सामाजिक सलोखा राखायचा आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. प्रक्षोभक भाषणांना बळी पडू नका… वाचाळवीरांची संख्या वाढली आहे… त्यांना महत्त्व देऊ नका… आपल्याला विकासाला महत्त्व द्यायचे आहे. एक सुसंस्कृत चेहरा आपल्याला राज्याला द्यायचा आहे. वंचित… दुर्बलांचा विचार करणारा आपला पक्ष आहे अशा शब्दात अजित पवार यांनी महिला मेळाव्यात मार्गदर्शन केले.
ही ताकद निवडणूकीपुरती न राहता हा आपला परिवार आहे. हलक्या कानाचे राहू नका… तुमच्याबद्दल मला आदर आहे. या महिला योग्य पध्दतीने काम करतात हे चित्र निर्माण करा… पक्षाची बदनामी होता कामा नये याची काळजी घ्या. राष्ट्रवादीचे अनेक कार्यक्रम पाहिले परंतु आज महिलांचे हे आजचे वादळ पहिल्यांदा पाहिले. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी हाक द्या असा शब्दही अजित पवार यांनी दिला.
