स्वित्झर्लंडमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा सूर.
दावोस, दि. १६ जानेवारी:
स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावेळी महाराष्ट्र गीत सुरु होताच त्यांच्या स्वरात स्वर मिसळून मुख्यमंत्री शिंदेंनीही महाराष्ट्र गीत गायले. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड येथे पोहोचले असता बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी स्वित्झर्लंडच्या भूमीत मराठी मातीचा सुगंध दरवळला..
स्वागत स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. एवढ्या भल्यापहाटे, कुडकूडणाऱ्या थंडीत, मराठमोळा वेष परिधान करून माझ्या स्वागतासाठी आलेल्या सर्व मराठी बांधव व भगिनींचे त्यांनी त्यांचे आभार मानले. परदेशातही आपल्या संस्कृतीशी असलेले घट्ट नाते जपून ठेवल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
नुकताच आपल्या राज्याला राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वात स्वच्छ राज्याचा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई शहर देखील बदलत असून ते स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी आपण ‘डीप क्लिन ड्राइव्ह’ मोहीम राबवत आहोत. प्रत्येक शनिवार-रविवार मी स्वतः त्या मोहिमेत सहभागी होत असून संपूर्ण शहर स्वच्छ करत आहे.या मोहिमेमुळे मुंबई शहराच्या प्रदूषण पातळीत घट झाली असून ती ३८० वरून ८० पर्यंत खाली आली आहे. पुढच्यावेळी जेव्हा आपण सारे मुंबईत याल तेव्हा आपल्या सर्वांना स्वच्छ सुंदर आणि बदललेली मुंबई पाहायला मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
