राम मंदिरास राजीव गांधींच्या काळातच परवानगी !
निपाणी, दि. १६ जानेवारी:
अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्यानंतर मंदिर बांधण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिली. शिलान्यासही राजीव गांधींच्या कालखंडामध्येच झाला नंतरच्या काळामध्ये हे प्रकरण न्यायालयात गेले आणि सुप्रीम कोर्टाने मंदिर बांधण्यासंदर्भातील निकाल दिला. अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी योगदान दिले पण त्या रामभक्तांचा विचार बाजूला ठेवून भाजपा व RSS रामाच्या नावावर राजकारण करण्याचे काम केलेले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
कर्नाटक निपाणी येथील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, अयोध्यातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्याबद्दल देशातील सर्व लोकांना आदर आहे, त्यांचा कोणी अनादर करत नाही. त्यांच्याबद्दलच्या आदराच्या भावना या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात आहेत, देशाबाहेरचे भारतीयांच्या मनामध्येही तीच भावना आहे. देशात आज अनेक प्रश्न आहेत परंतु लोकांचे हे प्रश्न बाजूला ठेवून धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. मंदिर त्या ठिकाणी उभे करायला कोणाचेही विरोध नाही. पण धर्माच्या नावावर, मंदिराच्या नावावर समाजा-समाजामध्ये एक प्रकारचे अंतर कसे निर्माण करता येईल? हा राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन आहे. राज्यकर्ते देशातील उपाशी शेतकरी, मजूर, कष्टकरी यांच्यासाठी प्रयत्न करत नाहीत. देशाचे प्रधानमंत्री रामासाठी १० दिवस उपवास करणार आहेत,त्यांच्या रामाबद्दलच्या श्रद्धेचा मी आदर करतो पण या देशातली गरिबी हटवण्यासाठी असाच काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्यांचे कौतुक केले असते. मूलभूत प्रश्नांकडून लक्ष विचलित करून धार्मिक प्रश्नांवर काम या देशात सुरू झाले आहे म्हणून आपल्याला जागरूक व एक राहावे लागेल आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.
