कंगणाला मुंबईत करणार होम क्वॉरंटाइन!
मुंबई, दि. 7 सप्टेंबर 2020:
मुंबई व महाराष्ट्राशी पंगा घेणे बाॅलिवूड क्वीन कंगणा राणावतला महागात पडणार असे दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर अचानक धाड टाकली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यात आली. अनधिकृत बांधकाम आढळल्यास पालिकेकडून तात्काळ पाडकाम केले जाण्याची शक्यता आहे. तर 9 तारखेला कंगणा मुंबईत येताच तीला होम क्वारंटाइन केले जाणार आहे. तिच्या हातावर तसा शिक्काही मारला जाणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी तशी माहिती दिली असून त्याबाबतचा थेट सरकारी नियमही त्यांनी दाखवला.
आयसीएमआरने करोनाबाबतची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार परराज्यातून आलेल्यांना १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केले जाते. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्का मारला जातो. प्रशासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करेल, असे पेडणेकर यांनी सांगितले.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारमधील पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना पालिकेने क्वारंटाईने केले होते. यावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये मोठा वादही रंगला होता.
