श्रीरामांनी सत्तेसाठी ED, CBI चा दुरुपयोग केला नाही..

0
images - 2023-09-07T183720.067

श्रीरामांनी सत्तेसाठी ED, CBI चा दुरुपयोग केला नाही..

मुंबई, दि. ९ जानेवारी ;

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शाळांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या जीवन चरित्र स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे असे समजते. सदर स्पर्धेद्वारे श्रीरामाचे चरित्र जनतेसमोर जाईल हा उद्देश दर्शविला आहे. परंतु त्याचबरोबर सत्तेच्या त्यागाची श्रीरामांची शिकवण आणि सध्याचे  सत्तालोलुप गलिच्छ राजकारण, तेव्हाचे रामराज्य आणि आजचे रावणराज, सत्यवचनी, एकवचनी राम आणि आजचे खोटारडे, दांभिक सत्ताधारी आदी विषयांवरील निबंध, चित्रकला, कविता आणि नाट्यस्पर्धेत समावेश करावा, अशी आमची मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

प्रभू श्रीरामचंद्रांनी सत्तेचा हव्यास बाळगला नाही. राज्याभिषेकाच्या दिवशीच वनवास पत्करला. केवळ बंधुप्रेमापोटी लक्ष्मणानेही वनवास स्वीकारला. सिंहासनावर बसण्याची संधी चालून आली असताना भरताने श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राजत्याग केला. जिंकलेली लंका श्रीरामांनी बिभिषणाला दिली. सत्तेसाठी ईडी, सीबीआय, आयकर विभाग आदी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांचे होणारी दडपशाही किंवा सुरत आणि गुवाहाटीचा मार्ग हा रामाचा मार्ग नव्हता.

खुद्द श्रीरामांविरुद्ध निर्भयपणे मत मांडणाऱ्या सर्वसामान्य परिटाची दखल घेणारे तेव्हाचे रामराज्य आणि खासदारांना संसदेत बोलण्याची परवानगी न मिळणारी आजची लोकशाही, मृत्युशय्येवर असलेल्या रावणाकडून त्याच्या चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी लक्ष्मणाला पाठवणारे श्रीराम आणि ऐनकेनप्रकारे विरोधकांना संपविण्यात धन्यता मानणारे आजचे सत्ताधीश आदी विषयांचाही मंगलप्रभात लोढा यांनी या स्पर्धेत समावेश करावा.

धर्म-समाजात द्वेष निर्माण करणारी प्रवृत्ती ही प्रेम, सत्य, सद्भावना, एकता व समतेचा संदेश देणाऱ्या रावणाचा ही द्वेष न करणाऱ्या श्रीरामांच्या संदेशाशी प्रतारणा आहे. निरपराधांचे मॉबलिंचिंग ही निर्बलांची साथ देणाऱ्या श्रीरामांच्या शिकवणीची पायमल्ली आहे, बिल्कीस बानो, कुस्तिपटू असलेल्या देशाच्या सुवर्णकन्या आणि हाथरसमधील पीडित महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणे हे स्त्री स्वाभिमानासाठी युद्ध करणाऱ्या श्रीरामनीतिच्या अगदी विपरित आहेत, हे विषय सुद्धा मंगलप्रभाल लोढा यांनी सदर स्पर्धेत समाविष्ट करावेत.

श्रीरामाने मर्यादा शिकवली आता नैतिक, संविधानिक आणि लोकशाहीतील मर्यादा सर्रास ओलांडल्या जात आहेत. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात प्रवेश देताना श्रीरामांचा विसर कसा पडतो? श्रीरामांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण सर्वाधिक महत्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांपेक्षा संविधानाची शपथ विसरलेल्या लोढांनी व भाजपाने शिकणे अधिक आवश्यक आहे.

लोढा व भाजपाने आधी श्रीरामांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करावे असा टोला सचिन सावंत यांनी लगावला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *