शिवसेनाप्रमुख आज जिवंत असते तर…..
शिवसेनाप्रमुख आज जिवंत असते तर…..
राजापूर, दि. ९ जानेवारी :-
अयोध्येतील राम मंदिर उभारणे आणि काश्मीरमधील 370 कलम हेटवणे ही बाळासाहेब ठाकरे यांची दोन्ही स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असून आज बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानाची तिसरी सभा आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजापूरमध्ये येथे पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई आणि ठाणे हे शिवसेनेचे शरीर असेल कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे हे शिवसेनेची फुफ्फुसे आहेत. या दोन जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कायमच शिवसेनेला भक्कम साथ दिलेली आहे. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांचे कोकणावर विशेष प्रेम होते. कोकणातील माणूस हा फणसासारखा बाहेरून कठोर दिसत असला तरी आतून मऊ असतो मात्र एकदा का त्याने ठरवले की तो समोरच्या विरोधकाचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसत नाही.
दीड वर्षांपूर्वी आम्ही घेतलेला निर्णय हा वैयक्तिक स्वार्थासाठी घेतला नसून बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत रहावा यासाठी घेतला असल्याचे सांगितले. विझलेल्या मशालीचा उजेड कधी पडत नाही. सत्तेपेक्षा नाव मोठे असते आणि ते कायम जपायचे असते असे बाळासाहेब नेहमी म्हणत, आम्ही सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठी एकत्र आलो आहे. आम्ही केलेले धाडस फक्त महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण जगाने पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्ही सारे वारसदार असून त्यांच्या संपत्तीचा आम्हाला मोह नाही, त्यामुळे जेव्हा पक्षाच्या खात्यातील 50 कोटी उबाठा गटाने मागितले तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता ते काढून दिल्याचे सांगितले.
अयोध्येत राम मंदिर तयार करणे आणि काश्मीरमधील 370 कलम हटवणे ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत. मात्र आज त्यांच्या हेतुवर शंका घेतली जात आहे. त्यांच्याबद्दल मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बतएंगे अशी टीका करण्यात आली पण मोदींनी मंदिरही बांधले आणि 22 जानेवारी ही तारीख देखील जाहीर केली. आता राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण मला मिळाले असून या कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले.
कोकणाचा सर्वांगीण विकास करून त्याला राज्यात नंबर एकचा विभाग बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, राज्य शासनाने काजू उत्पादकांचे प्रश्न समजून त्याना दिलासा देण्यासाठी काजू बोर्डाची स्थापना केली असल्याचे सांगितले. आंबा बागायतदारांसाठी आंबा बोर्ड करणार असून पीक विमा योजनेत आंबा पिकाचा समावेश करण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बांदरापाशी उद्योग विभागामार्फत मरीन प्लाझा तयार करण्यात येत आहे. कोकणातील प्रमुख देवस्थानांच्या विकासासाठी निधीही देण्यात येईल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कोकणातील नद्यांचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी एमएमआरडीए प्रमाणे कोकण क्षेत्रीय विकास प्राधिकरण स्थापन करून त्यासाठी 500 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवडी न्हावाशेवा दरम्यान तयार करण्यात आलेल्या 22 किलोमीटरचा अटल सेतूमुळे कोकण ते मुंबई अंतर जवळ येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई- सिंधुदुर्ग- गोवा हा सुपर एक्स्प्रेस एक्सेस कंट्रोल महामार्ग आपण तयार करत असून त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यासोबतच मुंबई गोवा महामार्गाचे अपूर्ण काम येत्या वर्षभरात नक्की पूर्ण करण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जगभरात नावलौकिक कमावत आहे. राज्य सरकारला त्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारा माणूस पंतप्रधान म्हणून हवा की देशाला सर्वस्व देणारा माणूस पंतप्रधानपदी हवा ते आपल्याला ठरवायचे आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अब की बार, मोदी सरकार, 45 पार हे आपले घोषवाक्य असून त्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. आगामी लोकसभा निवडणुकीत 45 हुन अधिक जागा आपल्याला जिंकायच्या असल्याचे सांगत यासाठी महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन सर्वांना केले.
