बाळासाहेबांचे स्वप्न साकार होताना पाहणार !
ठाणे, दि. ८ जानेवारी :-
आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी ते अयोध्येला जाणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला येण्याचे मान्य केले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना राज्यातही १८ ते २२ जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन तमाम शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे.
अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे असे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळा पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असे शिंदे सांगितले.
