MPSC कडून विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा…

0
IMG-20240102-WA0074

MPSC कडून विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा…

मुंबई, दि. २ जानेवारी;

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शिंदे-पवार-फडणवीस सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला आहे. MPSC ने नुकतीच केवळ २०५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधिक्षक, तहसीलदार सारख्या प्रशासनातील महत्वाची पदे नाहीत. MPSC साठी सर्वसामान्य गोरगरीब व ग्रामीण भागातील ३२ लाख विद्यार्थी तयारी करत आहेत, त्यांची घोर थट्टा आहे. मुख्य परिक्षेपर्यंत महत्वाच्या पदांची जाहिरात प्रसिद्ध करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा खणखणीत इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले की, शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ७५ हजार पदांचा लॉलीपॉप दाखवला आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मात्र थट्टा चालवली आहे. एमपीएससीची नवीन परिक्षा पद्धत दोन वर्षांनी लागू करावी यासाठी विद्यार्थ्यांनी मध्यंतरी मोठे आंदोलन केले होते, एमपीएससी व भाजपा सरकार या आंदोलनाचा बदला घेत आहे का? भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? एमपीएससीने सर्व पदांची एकच परीक्षा घेण्याची भूमिकाही घेतली होती, अशा कल्पना कोणाच्या ‘सुपीक’ डोक्यातून येतात? सरकारने आधी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची तयारी केली होती. जळगाव जिल्ह्यात तर तहसीलदार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात दिला होती. आता तर एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांना थेट सह सचिव पदांवर थेट नियुक्ती केली जात आहे. UPSC मधून नियुक्ती झाल्यानंतर १६ वर्षांच्या सेवेनंतर या पदावर वर्षी लागते पण आता काही मुलांसाठी थेट भरती केली जात आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांना प्रशासनात संधी डावलण्याचे हे षडयंत्र आहे.

राज्यात तब्बल २.५ लाख पदे रिक्त आहेत पण सरकार या पदांची भरती करत नाही. ७५ हजार पदांची भरती करण्याचे लॉलीपॉप दिला पण अद्याप भरती केली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रशासकीय सेवेसाठी पद भरती केली जाते त्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा भंग केला जात असून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली आहे. सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून मुलांना न्याय द्यावा असेही लोंढे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *