विजयस्तंभाच्या स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा.
विजयस्तंभाच्या स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा…
मुंबई दि.१ जानेवारी –
भीमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभा जवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून येथे शौर्याची प्रेरणा देणारे भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे. यासाठी राज्य सरकारने 500 कोटींच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटुन लवकरच पत्र देणार असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.भीमा कोरेगाव लढाईचा इतिहास हा पूर्वाश्रमीच्या महार पूर्वजांच्या अतुलनीय शौर्याचा प्रेरणादायी इतिहास आहे. हा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दाखवून आमच्यातील शौर्याचा क्रांतीचा निखारा जागृत केला आहे. तीच शौर्याची, क्रांतीची, संघर्षाची प्रेरणा घेऊन जीवनात मार्गक्रमण करण्याचा आमचा आजचा नवीन वर्षाचा संकल्प आहे.
आंबेडकरी जनतेच्या वतीने दरवर्षी १ जानेवारी हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. लाखो आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला भेट देऊन विनम्र अभिवादन करतात. त्यासाठी येथे जागा अपुरी पडत आहे.या परिसरातील 100 एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून भीमा कोरेगाव च्या ऐतिहासिक विजय स्तंभाचे भव्य आंतररष्ट्रीय स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने 500 कोटी निधीची तरतूद केली पाहिजे. असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
2024 हे नवीन वर्ष विकासाचे आणि निवडणुकीचे वर्ष आहे. या वर्षात दलित आदिवासी ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, दिव्यांग सर्व नागरिकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. प्रधान मंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे विकासाचे वर्ष ठरणार आहे. मोदींच्या नेतृत्वात सर्वांना न्याय मिळत आहे. नव्या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एन डी ए ४०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
