लोकसभेच्या ४८ जागांसाठी शिवसंकल्प अभियान.

0
IMG-20230715-WA0133

लोकसभेच्या ४८ जागांसाठी शिवसंकल्प अभियान.

मुंबई, दि. ३१ डिसेंबर :
राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक व्हिसीद्वारे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते. या पक्ष पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले.

हे प्रचारमेळावे दोन टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा ६ जानेवारी रोजी यवतमाळ येथुन सुरू होणार असून ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्याना पुन्हा सुरूवात होणार असून २५  जानेवारी रोजी शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल. या प्रचार मेळाव्यांच्या समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे. महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.

या शिवसंकल्प अभियानाची तयारी करण्यासाठी एक मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली असून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या साथीने या प्रचार मेळाव्यांची  तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले आहे. शिवसंकल्प अभियानाप्रमाणेच महायुतीच्या एकत्रित सभाही राज्यभरात आयोजित करण्यात येतील. शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी शिवसंकल्प अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *