‘बाबरी’ची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली..

0
20220703_104307

‘बाबरी’ची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी घेतली..

 

अमरावती, दि.२७ डिसेंबर :

राम मंदिर झाल्याचा आनंद आहे पण बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता. एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाकी कुणी म्हटलं नव्हतं बाबरी आम्ही पाडली म्हणून, त्यामुळे जो काही संघर्ष होता त्यामध्ये शिवसेनेची भूमिका होती की नाही, याबद्दल वाद घालण्यात काही अर्थ नाही.शिवसेनेची भूमिका होती हे स्वत: बाळासाहेबांच्या वक्तव्यांमधून ऐकलं होतं. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, देशातील मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये कुठलेही ठोस काम जनतेसाठी केले नाही आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाताना ठोस कार्यक्रम नसल्याने राम मंदिराच्या माध्यमातून जनतेमध्ये येऊन वेगळं मत तयार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

तीन राज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत, असं अजिबात होत नाही. आज इंडिया आघाडीत आम्ही जे एकत्र आहोत, त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी खबरदारी घेण्याची आमची तयारी आहे. त्या कामास आम्ही सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात एकत्र लढल्यास आम्हाला यश नक्कीच मिळेल असंही शरद पवार म्हणाले.

निवडणुक लढवण्यासाठी चेहऱ्याची आवश्यकता असल्याचं काही कारण नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही. १९७७ सालच्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी कोणताही चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता. निवडणुक झाल्यावर मोरारजी देसाई यांची निवड करण्यात आली. देसाईंचा चेहरा वापरून १९७७ सालची निवडणूक लढली गेली नाही. त्यामुळं २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील पंतप्रधान पदासाठी चेहरा जाहीर न केल्यास काही फरक पडणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *