मुंबईतून एकही हिरा उद्योग सुरतेला गेला नाही.
मुंबईतून एकही हिरा उद्योग सुरतेला गेला नाही.
नागपूर, दि. २१ डिसेंबर :
सुरत डायमंड बुर्सचे उदघाटन झाले हे खरे आहे. पण सुरत डायमंड बुर्स आणि मुंबईत असलेला भारत डायमंड बुर्स या दोन्हीच्या कार्यपद्धतीत फरक. सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट हब आहे. मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, भारतातील 38 बिलियन डॉलर्स इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईतून होते. ती एकूण निर्यातीच्या 75 टक्के आहे तर सुरतचा निर्यातीतील वाटा 12 टक्के जयपूरचा 3.12 टक्के आहे. पॉलिश डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी मुंबईतून 97 टक्के होते.
मध्यंतरी युएई आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला असून त्यात मुंबईला उत्पादन केंद्र म्हणून भक्कम करणार आहे. महापेत 20 एकर जागा दिली आणि आशियातील सर्वांत मोठा ‘जेम्स अँड ज्वेलरी पार्क’ तेथे उभा रहात आहे. या पार्कसाठी 5 एफएसआय, वीज दरात सवलत, जीएसटीतून दिलासा असे अनेक निर्णय घेतले आहेत.
मलबार गोल्डने ऑक्टोबरमध्ये 1700 कोटींची गुंतवणूक केली तर तनिष्क सुद्धा डायमंड क्षेत्रात गुंतवणूक करत आहे आणि तुर्की डायमंड बुर्स सुद्धा मुंबईत येत आहे. पंतप्रधान मोदींनी 2030 पर्यंत हिरे उद्योग 75 बिलियन डॉलर्स इतका मोठा व्हावा, अशी अपेक्षा केली आहे. याचा मोठा फायदा मुंबईलाच होणार आहे. मुंबई ही मुंबई आहे. मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका असे फडणवीस यांनी सांगितले.
