टॅक्सी चालवणा-या स्मिताचा प्रवास प्रेरणादायी..
फिरत्या चाकांवर संसाराला आकार देणार्या स्मिताचा प्रवास प्रेरणादायी.
मुंबई दि. ६ सप्टेंबर:
लाॅकडाउनमधे नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेणार्या स्मिता झगडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायविंग सीट वर असलेल्या स्मिता केवळ गाडी नव्हे तर महिला सक्षमीकरणाच सारथ्य करत असल्याची भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
आज आपल्या निवासस्थानी मंत्री ॲड ठाकूर यांनी स्मिता झगडे यांचा सन्मान केला.
मुंबईत राहणार्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायविंग स्कुलमधे चारचाकी चालविण्याच प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाउनमधे त्यांचा रोजगार बुडाला. ३ महिने कुठलीही कमाई नाही. एकल पालकत्वाची जबाबदारी अशा सगळ्या परिस्थितीत
स्मिता यांना आपल्या मुलीसाठी, संसारासाठी काहीतरी करणं भाग होतं. नोकरीच्या मागे न लागता, ड्रायविंग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल असा विश्वास बाळगत त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. याआधी इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांनी त्यांना हे बाईच काम नाही, यात पडू नये असे सल्ले दिले. पहिल्याच दिवशी १५०० रु. च्या कमाईने त्यांचा आत्मविश्वास वाढला. शहर पुर्वपदावर आल्यावर सगळं सुरळीत होईल अशी आशा त्या बाळगतात.
आज राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी सत्कार केल्याने स्मिता भारावून गेल्या. “ठाकूर मॅडमनी काही झाल तरी मागे फिरु नकोस,
मी तुझ्या सदैव सोबत आहे असं सांगत मला आशीर्वाद दिला. आज मला मी योग्य निर्णय घेतला याची खात्री झाली” अशा भावना स्मिता यांनी व्यक्त केल्या. अजून एक टॅक्सी घेत त्याद्वारे एका महिलेलाच रोजगार देण्याची स्मिता यांची इच्छा आहे. वाहनचालक म्हणून काम करत आपण संसाराला नक्कीच हातभार लावू शकतो असा संदेश त्या महिलांना देतात.
***
