..तर युवाशक्ती काय करु शकते हे सरकारला समजेल.

0
20231213_095603

..तर युवाशक्ती काय करु शकते हे सरकारला समजेल..

नागपूर, दि. १३ डिसेंबर :

सरकार जर ऐकत नसेल तर युवाशक्ती काय करु शकते? हे सरकारला देखील समजेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोप सोहळ्यात ते नागपूरात बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, या देशामध्ये काळ्या आईशी ईमान राखणारा हा शेतकरी त्याची संकटे दूर करण्यासाठी अनेक कार्यक्रम हे संघर्ष यात्रेतून झाले. आरक्षणाचा प्रश्न मराठा, धनगर, लिंगायत आरक्षण यावर चर्चा झाली. त्यामुळे या तरुणांना मी धन्यवाद देतो. मी देखील जळगाव ते नागपूर पर्यंत यात्रा काढली तेव्हा अमरावती जिल्ह्यात पोहरा या ठिकाणी अटक झाली होती. यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला. तुम्ही एसटीत कधी बसले का? त्यानंतर पोलिसांनी आज मला बसवले. सामुदायिक शक्तीपुढे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झुकावं लागलं होतं. अशी आठवण पवार यांनी सांगितले.

 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दसरा सणाच्या मुहूर्तावार पुणे येथून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेने २४ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर असा प्रवास केला. या यात्रेने १० जिल्हे, ३० तालुके आणि सुमारे ८०० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. नागपूरमधील झीरो माइल चौकात या यात्रेचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.

 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, रोहित पवारांनी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने युवकांचे प्रश्न समजून घेतले. अलिकडच्या आजच्या तरुणांमध्ये धमक आहे की, नाही हा प्रश्न पडला असतानाच रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी मोठा ड्राइव्ह राबवला. यातून त्यांनी राजकीय क्षितिजावर आपले नाव उमटवले. युवकांची ही संघर्ष यात्रा आज विधानभवनावर धडकली. तेव्हा या दोन्ही युवा नेत्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असे म्हणत जयंत पाटील यांनी रोहित पवार आणि रोहित पाटील यांचे अभिनंदन केले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज आपल्याला बेकारीच्या समस्येंना ग्रासलंय. जेव्हा सर्व मित्र पक्षांचं केंद्रात सरकार होतं तेव्हा बेरोजगारी ही ५.८८ टक्के होती. आज भाजपला दहा वर्ष होतायेत. सध्या बेरोजगारी ही १०.८ टक्क्यांवर पोहचवली. आज प्रत्येकाला विविध माध्यमांतून टॅक्स भरावा लागतो. आज देशातील जनता महागाईने त्रस्त आहेत. त्यामुळे जनता आता संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत असेसुद्धा यावेळी जयंत पाटील म्हणाले.

आमदार अनिल देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न काढले की, हे सरकार घाबरते, कारण या सरकारने परदेशातून कापूस आयात केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाही. त्यासाठी या सरकारला प्रश्न विचारायचे आहे. संत्र्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. हे सरकार काय करताहेत. २०१३ रोजी विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, सोयाबीन, कापसाला चांगला भाव दिला. कपाशीला १४ हजार तर सोयाबीनला ८ हजार भाव दिला पाहिजे. त्यामुळे लाव रे तो व्हिडिओ स्टाईल वापरुन काय म्हणाले होते. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे हे सरकार आहे. खोटं आश्वासन देणारे हे सरकार आहेत. पन्नास खोके देऊन शिवसेनेचे आमदार फोडले. आता ईडी सीबीआयच्या भीतीने हे आमचे राष्ट्रवादी फोडली. त्यामुळे हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. हा सिंचन घोटाळा आमचं सरकार पूर्ण करेल असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस याचं काय अवस्था काय झाली आहे.

 

रोहित पवार म्हणाले की, आमच्या शेतकऱ्यांना काय फक्त फाशी घ्यायची का?, एक रुपयाचा विमा देऊ नका, आम्हाला एक रुपया घ्या, दोन रुपया घ्या, पण जेव्हा गरज आहे तेव्हा आम्हाला मदत करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी सांगितले आहे. दंगल होते तेव्हा गरीबांचेच लोक मरतात, त्यांच्याच डोक्यात दगड पडतात. तर जे घडवून आणतात ते निवांत घरात बसतात, असा त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की, त्यांनी स्वाभीमानाने जगायला शिका, जातीयवादाचे राजकारण महाराष्ट्रात अजिबात नको, युवकांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून योग्य विचारांच्या पाठिमागे पुढे रहा, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व मोर्चा आता विधिमंडळावर घेऊन जाणार आहोत, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या कापुस, सोयाबीन, धान, संत्रा, तुर व इतर शेतमालास योग्य भाव द्या, पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या, राज्यातील विविध खात्यातील रिक्त पदे त्वरित भरा, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागु करा, कंत्राटी नोकरभरती रद्द करा, ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवा, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, शाळा दत्तक योजना रद्द करा, समुह शाळा योजना रद्द करा, या व इतर मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ. रोहीत पवार यांनी ही युवा संघर्ष यात्रा काढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *